esakal | टीम नड्डा - २ मधून नारायण राणेंना वगळले; रहाटकरांबाबत नजरचूक
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane

जास्तीत जास्त नव्या पक्षनेत्यांना राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून ‘टीम नड्डा‘ मध्ये काम करण्याची संधी देण्यावर भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाचा भर असल्याचे यादीवरून दिसते.

टीम नड्डा - २ मधून राणेंना वगळले; रहाटकरांबाबत नजरचूक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखालील नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा घटस्थापनेच्या मुहूर्तावर केली. जास्तीत जास्त नव्या पक्षनेत्यांना राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून ‘टीम नड्डा‘ मध्ये काम करण्याची संधी देण्यावर भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाचा भर असल्याचे यादीवरून दिसते. ३०९ जणांच्या या जम्बो टीम नड्डा-२ मध्ये राज्यातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मंगलप्रभात लोढा (मुंबई) तसेच विनोद तावडे, पंकजा मुंडे, डॉ. हीना गावित यांच्याबरोबरच माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार विनय सहस्त्रबुद्धे, सुनील देवधर, अल्पसंख्यांक आघाडीचे जमाल सिद्दीकी यांची नावे या यादीत आहेत.

आशिष शेलार, चित्रा वाघ व सुधीर मनुगंटीवार यांना विशेष आमंत्रित म्हणून कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. मात्र केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थानही देण्यात आलेले नाही. या कार्यकारिणीत ८० सदस्य, ५० विशेष आमंत्रित व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री आदी १७९ कायम स्वरूपी आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशिवाय टीम मोदीमधील निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, अमेठीच्या खासदार स्मृती इराणी, जितेंद्र सिंह, अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान, एस. जयशंकर, भूपेंद्र यादव, गिरीराज सिंह, नरेंद्र तोमर आदी बहुतेक मंत्र्यांची वर्णी यादीत लागलेली आहे. योगी आदित्यनाथ व शिवराजसिंह चौहान यांच्यासह भाजपचे सध्याचे १२ मुख्यमंत्री व ८ उपमुख्यमंत्रीही राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, बी एस येडियुरप्पा यांची नावे कायम ठेवली आहेत. रामजन्मभूमी आंदोलनातील फायरब्रॅंड नेते विनय कटियार यांचा पत्ता कट झाला आहे.

रहाटकरांबाबत नजरचूक, राणेंचे काय ?
भाजप महिला आघाडीच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांचेही नाव अधिकृत यादीत नाही. त्यांचे नाव नव्या कार्यकारिणीत नसल्याचे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नड्डा यांनी आज दुपारी रहाटकर यांच्याशी चर्चा केली व त्यांचे कार्यकारिणीतील स्थान अबाधित असल्याची ग्वाही दिली. अधिकृत यादीत ‘नजरचुकीने‘ रहाटकर यांचा नामोल्लेख राहिल्याचे भाजपमधून सांगण्यात आले. राणे हे केवळ केंद्रीय मंत्री नाहीत तर ते महाराष्ट्रासारख्या राज्याचे माजी मुख्यमंत्रीही आहेत. ते भाजपमध्ये नवीन म्हणून ‘राष्ट्रीय टीम' मधे त्यांचे नाव नाही म्हणावे तर ज्योतिरादित्य सिंदे, अश्विनी वैष्णव, मिथून चक्रवर्ती, दिनेश त्रिवेदी यासारख्या इतर पक्षांतून भाजपवासी झालेल्या अनेकांना या यादीत स्थान मिळाले आहे.

हेही वाचा: राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ

महाराष्ट्र पुसटसाच !
या टीममध्ये उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल आदी राज्यांचे अस्तित्व ठसठशीतपणे जाणवते. मात्र गडकरी, जावडेकर, फडणवीस, चंद्रकांत पाटील, सहस्त्रबुद्धे व गोयल वगळता राज्यातील ठळक नावे अभावानेच दिसतात. अनेक विभाग असे आहेत की ज्यात मराठी नावे नाहीतच. १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ७ महामंत्री, युवा, महिला, ओबीसी, शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती या आघाड्यांची अध्यक्षपद यात महाराष्टारीतल एकही नाव नाही. तब्बल २६ राष्ट्रीय प्रवक्त्यांमध्ये बिहार विधानपरिषदेचे सदस्य व मंत्री असलेले शहानवाज हुसेन व संजय मयूख, कॉंग्रेसमधून आलेले टॉम वढक्कन आदींची नावे आहेत. यात राज्यातून केवळ हीना गावित या एकट्याच आहेत.

महाराष्ट्रातील सदस्य
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुध्दे, चित्रा वाघ (कार्यकारिणी सदस्य), देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर (विधिमंडळ पक्षनेते) चंद्रकांत पाटील (प्रदेशाध्यक्ष), विनोद तावडे, सुनील देवधर (राष्ट्रीय मंत्री), सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार, लड्डाराम नागवाणी (विशेष आमंत्रित), हीना गावित (प्रवक्त्या), जमाल सिददीकी (अल्पसंख्यांक आघाडी), सी टी रवी, जयभानसिंग पवैय्या व ओमप्रकाश धुर्वे (प्रभारी, सहप्रभारी)

loading image
go to top