Economic Income : आर्थिक कमाईत भाजपची आघाडी! तिजोरीत २ हजार ३६१ कोटी जमा; उत्पन्नामध्ये काँग्रेस दुसऱ्या स्थानी

देशभरातील सहा राष्ट्रीय पक्षांनी मागील आर्थिक वर्षाचे (२०२२-२३) एकूण उत्पन्न जाहीर केले असून ते ३ हजार ०७७ कोटी रुपये एवढे आहे.
 BJP
BJPesakal

नवी दिल्ली - देशभरातील सहा राष्ट्रीय पक्षांनी मागील आर्थिक वर्षाचे (२०२२-२३) एकूण उत्पन्न जाहीर केले असून ते ३ हजार ०७७ कोटी रुपये एवढे आहे. यात भाजपचा वाटा मोठा असून त्यांचे उत्पन्न हे २ हजार ३६१ कोटी रुपये एवढे असल्याची माहिती ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)’ या संघटनेकडून देण्यात आली. एकूण सहा राष्ट्रीय पक्षांनी त्यांचे एकूण उत्पन्न जाहीर केले असून त्यात भाजपचा वाटा हा ७६.७३ टक्के एवढा आहे.

उत्पन्नाच्या बाबतीत काँग्रेस (४५२.३७५ कोटी) दुसऱ्या स्थानी असून अन्य पक्षांशी तुलना करता त्यांचा वाटा हा १४.७० टक्के एवढा आहे. काँग्रेस आणि भाजप व्यतिरिक्त बहुजन समाज पक्ष (बसप), आम आदमी पक्ष (आप), नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) यांनी त्यांचे उत्पन्न जाहीर केले आहे.

‘आरटीआय’मधून मागविली माहिती

‘एडीआर’ने माहिती अधिकाराच्या माध्यमातून इलेक्टोरल बाँडबाबतीत ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’कडून काही माहिती मागविली होती. त्यात या राजकीय पक्षांनी बाँड मोडून २, ७९७.३५६ कोटी रुपये मिळविल्याची बाब समोर आली होती. केवळ राष्ट्रीय पक्षांनी १५१०.६२ कोटी रुपये हे या बाँडच्या माध्यमातून कमावले आहेत. २०२१-२२ आणि २०२२-२३ या काळामध्ये भाजपच्या उत्पन्नामध्ये २३.१५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

काँग्रेस, आपचा खर्च

काँग्रेसचे एकूण उत्पन्न हे ४५२.३७५ कोटी रुपये एवढे असताना त्यांचा खर्च मात्र ४६७.१३५ कोटी रुपये एवढा आहे. येथे त्यांचा खर्च हा उत्पन्नाच्या ३.२६ टक्क्यांनी अधिक आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकूण उत्पन्न हे १४१.६६१ कोटी रुपये एवढे असून त्यांचा खर्च १०६.०६७ कोटी रुपये (७४.८७ टक्के) एवढा आहे. ‘आप’चे उत्पन्न ८५.१७ कोटी रुपये एवढे असून त्यांचा खर्च १०२.०५१ कोटी रुपये एवढा आहे. त्यांचा खर्च हा उत्पन्नापेक्षा १९.८२ टक्क्यांनी अधिक आहे.

‘आप’चे उत्पन्न वाढले

मागील दोन वर्षांमध्ये ‘आप’च्या उत्पन्नामध्ये ९१.२३ टक्क्यांची वाढ झाली आहे. ईशान्येकडील केवळ ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ (एनपीपी) या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला असून त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाल्याचे दिसून येते.

बाँड मोडून कमाई

इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून भाजपला १२९४.१५ कोटी रुपये मिळाले असून काँग्रेसला १७१.०२ कोटी तर ‘आप’ला ४५.४५ कोटी रुपये एवढा निधी मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com