सिसोदियांना तुरुंगात पाठवण्यामागं भाजपचं मोठं षडयंत्र; पत्रकार परिषद बोलावून 'आप'नं व्यक्त केली भीती I Delhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manish Sisodia

Delhi : सिसोदियांना तुरुंगात पाठवण्यामागं भाजपचं मोठं षडयंत्र; पत्रकार परिषद बोलावून 'आप'नं व्यक्त केली भीती

दिल्ली : माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याबाबत आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) भाजपवर (BJP) गंभीर आरोप केला आहे.

आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज (Saurabh Bhardwaj) यांनी भाजप सिसोदिया यांना मारणार असल्याची भीती व्यक्त केलीये. ते म्हणाले, सिसोदिया यांना तुरुंगात पाठवण्यामागं मोठं षडयंत्र आहे. होळीच्या दिवशी अचानक पत्रकार परिषद बोलावून ही भीती व्यक्त केली.

भारद्वाज म्हणाले, ‘मनीष सिसोदिया यांना तिहारच्या तुरुंग क्रमांक एकमध्ये काही षडयंत्राखाली ठेवण्यात आलं आहे. अशी पहिली चाचणी असताना या कारागृहात लोकांना ठेवलं जात नाही. कारागृह क्रमांक एकमध्ये धोकादायक आणि हिंसक गुन्हेगार ठेवण्यात आले आहेत.’

मनीष सिसोदिया यांना अशा अनेक धोकादायक गुन्हेगारांमध्ये ठेवण्यात आल्याचं आपचे प्रवक्ते म्हणाले. हे कैदी अगदी छोट्याशा इशाऱ्यावरही कुणालाही मारू शकतात. भाजपचे आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी आहे, पण राजकारणात असं वैर असतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दिल्लीत तुम्ही आमचा पराभव करू शकत नसाल, एमसीडीमध्ये पराभूत करू शकत नसाल, तर या पराभवाचा बदला अशा प्रकारे घेणार का? पंतप्रधान या प्रकरणी गप्प का बसले आहेत. तुम्ही राजकीयदृष्ट्या 'आप'चं नुकसान करू शकत नाही, म्हणून आमच्या नेत्यांच्या हत्येचा कट रचत आहात, असा आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे.

भाजप नेते हरीश कुमार यांनी आप प्रवक्त्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, तिहार जेल तुमच्याकडंच आहे. मनीष सिसोदिया यांना आम्ही पाठवलं नाही, न्यायालयानं त्यांना तुरुंगात पाठवलंय. त्यामुळं बेताल विधानं करण्यापेक्षा कायद्याला महत्व द्या. आम आदमी पक्ष इतका घाबरलेला का आहे, असा सवालही त्यांनी केला.