
पाच राज्यांत काँग्रेसचा झालेला पराभव हा पक्षाला चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय.
पाच राज्यांत काँग्रेसचा (Congress Party) झालेला पराभव हा पक्षाला चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय. पंजाबसारखं राज्यही 'आप'नं काँग्रेसच्या हातून काढून घेतलं असून गोव्यातही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळं आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी या पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला होता. यात पंजाब प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांचाही समावेश होता.
विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर काँग्रेसचं नेतृत्व आत्मपरीक्षणात व्यस्त असताना पक्षाचे काही ज्येष्ठ नेते नेतृत्व बदलाची मागणी सातत्यानं करत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली (Veerappa Moily) यांनी पराभवातून निर्माण झालेल्या पक्षाच्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. मोईली म्हणाले, भाजप (BJP) आणि इतर पक्ष येत-जात राहतील. मात्र, काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, जो कायम राहील. यासोबतच मोईलींनी पक्षश्रेष्ठींना पुन्हा सत्तेत येण्यासाठी आपला दृष्टिकोन बदलण्यास सांगितलंय.
गुलाम नबी आझाद यांच्या घरी G-23 नेत्यांच्या बैठकीनंतर वीरप्पा मोईली यांचं हे वक्तव्य समोर आलंय. मोईली पुढे म्हणाले, निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी जीवन, समाज आणि प्रत्येक गोष्टींकडं पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. काँग्रेस हा चिरंतन पक्ष आहे. यासाठी मोईलींनी नेहरूंच्या विधानाचं उदाहरणही दिलंय. जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, काँग्रेसनं गरीब आणि मागासांसाठी काम करणं थांबवलं, तर पक्ष संपेल. म्हणून, आपण या लोकांसाठी काम केलं पाहिजे. भाजप हा सार्वकालिक पक्ष नाहीय. मोदींनंतर (Narendra Modi) भाजप टिकणं फार अवघड आहे, असंही ते म्हणाले.