काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपचा विजय; 'राज'कारणात शत्रूंचं झालं मनोमिलन

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 11 December 2020

काँग्रेस आणि भाजप हे राजकीय शत्रू. या दोन पक्षांमधून विस्तवही जात नाही.

जयपूर- काँग्रेस आणि भाजप हे राजकीय शत्रू. या दोन पक्षांमधून विस्तवही जात नाही. पण, राजकारणात कोणीही कामयचा शत्रू असत नाही, हेही तितकंच खरं. राजस्थानमध्ये याचा योग्य प्रत्यय आला आहे. राजस्थानमध्ये एक उमेदवाराला विजय करण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याचे दुर्मिळ चित्र पाहायला मिळालं. पहिल्यांदाच असं काहीतरी घडलं आहे. 

राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख निवडणूक पार पडत होती. यावेळी डुंगरपूर जिल्हा परिषेदेत चक्क काँग्रेसचा पाठिंबा घेत भाजपचा जिल्हा प्रमुख निवडून आला आहे. या पदासाठी भाजपच्या सूर्या अहारी यांनी काँग्रेसच्या पाठिंब्याने भारतीय ट्रायबल पार्टीचे  (BTP) समर्थन असणाऱ्या पार्वती यांचा एका मताने पराभव केला. त्यामुळे सूर्या अहारी यांच्याकडे जिल्हा प्रमुख पद आलं आहे. ही घटना कायम लक्षात राहील अशीच आहे. 

सरकार रेल्वेची महागडी जमीन प्रायवेट कंपनीला देणार; ऑनलाईन लिलाव सुरु

जिल्हा परिषदेच्या 27 जागांपैकी 13 जागांवर बीटीपीचं समर्थन असणारे अपक्ष उमेदवार निवडून आले होते. दुसरीकडे भाजपने 8 जागांवर तर काँग्रेसने 6 जागांवर विजय मिळवला होता. जिल्हा परिषदेत बीटीपीचं समर्थन असणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त होती. त्यामुळे त्यांचाच उमेदवार विजय होईल हे निश्चित वाटत होतं. बीटीपीलाही तशीच आशा होती. पण, राजकारणात कधी काय घडेल हे सांगत येत नाही. भाजप आणि काँग्रेसने याची प्रचिती आणून दिली. 

बीटीपीला रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजप एकत्र आले. त्यामुळे काँग्रेसने जिल्हा प्रमुख निवडणुकीत आपला उमेदवार दिला नाही. भाजपने आपली उमेदवार सूर्या अहारी यांना अपक्ष म्हणून उभं केलं. बीटीपीचा पाठिंबा असणाऱ्या पार्वती यांनीही अर्ज दाखल केला. प्रत्यक्ष मतदानावेळी सूर्या अहारी यांना काँग्रेसचे 6 आणि भाजपचे 8 अशी एकूण 14 मतं मिळाली. त्यामुळे 27 जागा असणाऱ्या जिल्हा परिषदेत त्यांचा विजय झाला, तर पार्वती यांना 13 मतं मिळाली. केवळ एका मतामुळे पार्वती यांना पराभव पाहवा लागला. दरम्यान, भारतीय ट्रायबल पार्टीने  Bharatiya Tribal Party (BTP) अशोक गेहलोत यांचे समर्थन काढून घेतले आहे. बीटीपी नेते छोटोभाई वसावा यांनी याची माहिती दिली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP win by taking congress support rajasthan news btp