अनैतिक संबंधांतून भाजप महिला नेत्याची गोळ्याझाडून हत्या; पती फरार

टीम ई-सकाळ
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

मुनेश घरी आपल्या बहिणीशी फोनवर बोलत असताना, सुनीलने त्यांच्यावर तीन गोळ्या झाल्या. त्यानंतर सुनील रिव्हॉल्वरसह फरार झाला.

गुरुग्राम (हरियाणा) : अनैतिक संबंधांच्या संशयातून भाजपच्या एका बड्या महिला नेत्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुनेश गोदारा असं त्यांचं नाव आहे. भाजपच्या दिल्लीतील उदयोन्मुख नेत्यांमध्ये त्यांचा उल्लेख केला जात होता. भाजपच्या किसान मोर्चाच्या सरचिटणीस म्हणून त्या काम पाहत होत्या. अनैतिक संबंधांच्या संशयावरून त्यांचे पती सुनील यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पती फरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनेश आणि सुनील चरखी दादरीचे रहिवासी होते. सध्या गुरुग्रामधील सेक्टर 93मध्ये राहत होते. मुनेश घरी आपल्या बहिणीशी फोनवर बोलत असताना, सुनीलने त्यांच्यावर तीन गोळ्या झाल्या. त्यानंतर सुनील रिव्हॉल्वरसह फरार झाला. पत्नी मुनेश परपुरुषासोबत फोनवर बोलत असल्याच्या संशयावरून सुनीलनं हे कृत्य केल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुनेश आणि सुनील यांचे 2001मध्ये लग्न झाले होते. पण, लग्नानंतर दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या दोघेही दोन मुले आणि सुनीलचे वडील यांच्यासह एका भाड्याच्या घरात राहत होते. सुनीलने लष्करातून स्वेच्छ निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो एका खासगी सिक्युरिटी कंपनीत काम करत होता. याप्रकरणी सुनीलच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सुनील फरार असून, पोलिस त्याच्या शोधात आहेत. सुनीलच्या वडिलांनी तक्रार दाखल करताना सून मुनेशचे भाजपच्या एका कार्यकर्त्याशी संबंध होते असा आरोप केला आहे. यावरून नवरा-बायकोमध्ये सातत्याने वाद होत असल्याचेही त्यांनी सांगितले.  

आणखी वाचा - शाहीनबाग आंदोलनावर सुप्रीम कोर्ट म्हणाले...

आणखी वाचा - ऍट्रॉसिटी कायद्यावर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

भाजपमध्ये सक्रीय
मुनेश भाजपमध्ये सक्रीय होत्या. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मुनेश यांचा रोजचा संपर्क होता. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डां यांचीही त्यांनी भेट घेतली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp woman leader shot dead by husband gurugram haryana