हरियानात भाजपचे बहुमताचे स्वप्न भंगले

पीटीआय
Friday, 25 October 2019

काँग्रेससह अन्य पक्षांच्या जागा भाजपपेक्षा कमी असल्यामुळे हरियानात त्रिशंकू विधानसभा येण्याची चिन्हे आहेत.

भाजपला सर्वाधिक ४० जागा; ‘जेपीपी’ किंगमेकर
चंडीगड -  हरियाना विधानसभेत ‘अबकी बार ७५ पार’चे स्वप्न रंगवणाऱ्या भाजपचे स्वप्न भंगले. मात्र, ९० सदस्यांच्या सभागृहात ४० जागा जिंकून भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेससह अन्य पक्षांच्या जागा भाजपपेक्षा कमी असल्यामुळे हरियानात त्रिशंकू विधानसभा येण्याची चिन्हे आहेत. साध्या बहुमतासाठी ४६ जागांची आवश्‍यकता आहे.  या स्थितीत दुष्यंत चौताला यांचा जननायक जनता पक्ष (जेपीपी) कळीची भूमिका निभावण्याची शक्यता आहे.

अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याच एका पक्षावर विश्‍वास व्यक्त केला नसल्याचे सिद्ध झाले. भाजपपाठोपाठ ३१ जागांसह काँग्रेस दुसऱ्या, तर जननायक जनता पक्ष (जेपीपी) दहा जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि हरियाना लोकहित पक्ष यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. आम आदमी पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. या परिस्थितीत दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष (जेपीपी) कळीची भूमिका निभावण्याची शक्‍यता आहे.

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे कर्नाळमधून ४५ हजार मतांनी विजयी झाले असले, तरी त्यांच्या सरकारमधील तब्बल सात मंत्री पराभूत झाले. पराभूतांमध्ये प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचाही समावेश असून, त्यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत १५ जागा मिळविणाऱ्या काँग्रेसने आतापर्यंत ३१ जागांवर विजय मिळविला आहे. भाजपला तेव्हा ४७ जागा मिळाल्या होत्या. याचाच अर्थ, पक्षाला ११ जागांवर फटका बसला आहे. ‘जेपीपी’ला नऊ जागा मिळाल्या असून, एका जागी हा पक्ष आघाडीवर आहे. सरकार स्थापनेसाठी हा पक्ष भाजपला पाठिंबा देणार की काँग्रेसचा हात धरणार, या प्रश्‍नावर दुष्यंत चौटाला यांनी तूर्त मौन राखले आहे. ‘हरियानातील जनतेला बदल हवा आहे,’ एवढेच त्यांनी सांगितले. अपक्ष सात जागांवर, तर बसप एका जागेवर आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या यशाबद्दल प्रदेशाध्यक्ष कुमारी शैलजा यांनी आनंद व्यक्त केला असून, ही नव्या न्यायाची सुरवात असल्याचे म्हटले आहे.

राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्‍यता गृहीत धरून भाजपश्रेष्ठींनी मुख्यमंत्री खट्टर यांना दिल्लीत पाचारण केले आहे. हरियानात भाजपेतर सरकार स्थापन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदरसिंह हुडा सक्रिय झाले असून, भाजपेतर पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ते स्वतः रोहत जिल्ह्यातील गढी संपला-किलोई मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

हरियानात भाजप सर्वांत मोठा ठरला असून, पुन्हा सरकार स्थापनेसाठी मतदारांनी आम्हाला कौल दिला आहे.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष

बडे उमेदवार पराभूत
भाजपच्या पराभूत उमेदवारांत सहकारमंत्री मनीष ग्रोव्हर, शिक्षणमंत्री रामविलास शर्मा, परिवहनमंत्री कृष्णलाल पंवार, कृषिमंत्री ओमप्रकाश धनक;त्तिसेच बबिता फोगट आणि कुस्तीपटू योगेश्‍वर दत्त यांचा समावेश आहे. मात्र, भारतीय हॉकी संघाचे माजी कप्तान संदीपसिंग विजयी झाले आहेत. काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवालाही कैथलमधून पराभूत झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP won 40 seats in the Haryana