
निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपनं ५० चा आकडाही गाठला नसता - ममता बॅनर्जी
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दणदणीत विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपला ५० पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोप ममता दीदींनी केला आहे. निवडणूक आयोगाचं पॅनल भाजपचं प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं असंही त्यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
हेही वाचा: ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि पिनरायी विजयन यांचं पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन
ममता म्हणाल्या, "यावेळी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची वागणूक भयानक होती. तृणमूलची यंदा डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही २२१ चा आकडा गाठू असा आम्हाला विश्वास होता." असा विश्वास तुम्हाला का होता? या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, "मी रस्त्यावर उतरुन लढणारी बाई आहे. पहिल्यापासूनच मी सांगत होते की आम्ही दोनशेपार जाऊ तर भाजप ७० पारही जाणार नाही. त्यामुळे जर निवडणूक आयोगानं भाजपला मदत केली नसती तर त्यांना ५० जागाही मिळाल्या नसत्या"
नंदीग्रामच्या पराभवावर ममता म्हणाल्या...
राज्यात तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असला तरी नंदीग्राममध्ये ममतांचा पराभव झाला आहे. मात्र, हा निकाल चुकीचा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, "नंदीग्राममधील पराभव हे आमचं नुकसान नाही. कारण या ठिकाणी मतमोजणीत छेडछाड करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. इतकं नव्हे तर मतदानाच्या दिवशी मी स्वतः मतदान केंद्राच्या बाहेर तीन तास बसून होते, कारण याठिकाणी कोणालाही मतदान करु दिलं जात नव्हतं"
ममता नंदीग्रामच्या निकालासाठी कोर्टात जाणार का?
ममता म्हणाल्या, "सध्या तरी आम्ही नंदीग्रामच्या निकालासाठी पुनर्रमोजणीची मागणी केली आहे. पोस्टल बॅलटची मतं आणि व्हीव्हीपॅटची मतं ही पुन्हा मोजली जायला पाहिजेत. भाजपच्या माफिया गँगने नंदीग्राममध्ये मतमोजणीत छेडछाड करण्याचं काम केलं आहे. लवकरच लोकांना यामागील सत्य कळेल"
Web Title: Bjp Wouldnt Have Crossed Even 50 Seats Without Ecs Help Says Mamata
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..