भाजपचे 'मिशन काश्मीर'; अमित शहांनी घेतली जगमोहन यांची भेट

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 3 September 2019

मोदी सरकारने काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द केल्यावर त्या निर्णयाची विस्ताराने माहिती देशवासियांना समजावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेतून सुरू झालेले देशपातळीवरील महिनाभराची जनसंपर्क मोहीम आजपासून सुरू झाली.

नवी दिल्ली : मोदी सरकारने काश्मीरसाठीचे कलम 370 रद्द केल्यावर त्या निर्णयाची विस्ताराने माहिती देशवासियांना समजावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पनेतून सुरू झालेले देशपातळीवरील महिनाभराची जनसंपर्क मोहीम आजपासून सुरू झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याशी या निर्णयाबद्दल चर्चा केली.

जगमोहन सध्या 91 वर्षांचे असून, त्यांची प्रकृती वयोमानानुसार बरी नाही. त्यामुळे ते फारसे घराबाहेर पडत नाहीत. वाजपेयी सरकारच्या काळात जम्मू काश्मीरचे राज्यपालपद सांभाळलेले जगमोहन काश्मीर समस्येवरील जाणकार मानले जातात. त्यांनी राज्यपाल असताना काश्मीरमधील भारताचा निधी व केंद्र सरकारची सुरक्षा व्यवस्था घेऊन पाकशी संधाण साधणाऱया फुटीरतावाद्यांना वेसण घातली होती. कलम 370 बाबत देशभरात जनजागृती करून विशेषतः बुध्दिजीवी वर्गाला या निर्णयाचे फायदे पटवून देण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या मोहीमेत शहा यांनी आज जगमोहन यांची भट घेऊन सुरवात केली.

कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा हेदेखील उपस्थित होते. यानंतर पक्षाचे पदाधिकारी, आमदार-खासदार, केंद्र व राज्यांचे मंत्री देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात व ग्रामीण भागात जाऊन जनजागरण करतील. यासाठी मंत्री गजेेंद्रसिंह शेखावत व धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली भाजप नेतृत्वाने समित्या नेमल्या आहेत.

मनमोहनसिंग यांच्या वक्तव्याशी सहमत नाही

माजी पंतप्रधान व विश्वविख्यात अर्थतज्ज्ञ  डाॅ. मनमोहनसिंग यांनी देशाच्या कोसळत्या अर्थव्यवस्थेवर नुकतेच परखड भाष्य केले होते. त्यांच्या टीकेशी सरकार असहमत असल्याची सावध प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

डाॅ. सिंग यांनी सत्ता सोडली तेव्हा (2014) भारतीय अर्थव्यवस्था जगात अकराव्या क्रमांकावर होती. सध्या ती पाचव्या स्थानी असून तिसऱया क्रमांकाकडे तिची वाटचाल सुरू आहे, असेही जावडेकर म्हणाले.

राजकारण सोडून जाणत्याचा सल्ला घ्या व खड्ड्यात चाललेल्या अर्थव्यवस्थेवर उपाय करा, अशी तीव्र भावनाही त्यांनी व्यक्त केली होती. डाॅ. सिंग यांचा या क्षेत्रातील अधिकार पाहता दुसऱया फळीतील नेत्यांनी यावर व्यक्तिशः बोलू नये, असे भाजपने संघटनात्मक पातळीवर ठरविले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs public relations campaign Started Amit Shah meets Jagmohan