न्यूज चॅनेल विरोधात बॉलिवूड गेले कोर्टात; बदनामी केल्याचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 12 October 2020

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर मीडिया ट्रायल करणाऱ्या दोन न्यूज चॅनेल विरोधात बॉलिवूडच्या निर्मात्यांनी दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

नवी दिल्ली : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर मीडिया ट्रायल करणाऱ्या दोन न्यूज चॅनेल विरोधात बॉलिवूडच्या निर्मात्यांनी दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टी अर्थात बॉलिवूड विरोधात अतिशय बेजबाबदार आणि अपमानास्पद टीका टिप्पणी केल्याचा आरोप बॉलिवूड असोसिएशनच्या वतीने करण्यात आलाय. यात एक-दोन नव्हे तर, 34 बॉलिवूड निर्माते, प्रोडक्शन हाऊस यांचा समावेश आहे. 

बॉलिवूडच्या प्रोडक्शन हाऊसनी काही मीडिया हाऊसनी अतिशय बेजबाबदार रिपोर्टिंग केल्याचा ठपका ठेवत दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. यात करण जोहर, यशराज फिल्मस, आमीर खान, शाहरूख खान, सलमान खान यांच्या प्रोडक्शन हाऊसचाही समावेश आहे. एकूण 34 निर्मात्यांनी एकत्र येत कोर्टात याचिका दाखल केली आहे. या संदर्भात एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, रिपब्लिक टीव्हीचे अर्णब बोस्वामी आणि प्रदीप भंडारी तसेच टाइम्स नाऊचे राहुल शिवशंकर आणि नविका कुमार यांच्या विरोधात कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सोळाव्या बाळाला जन्म देऊन, आईनं सोडला जीव; बाळाचाही मृत्यू

सिनेमा क्षेत्रातील कलाकारांच्या विरोधात मीडिया ट्रायल चालवण्यात येऊ नये तसेच त्यांच्या वैयक्तिक आणि गोपनीयतेच्या हक्काला धक्का पोहचवू नये, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आलीय.

सुशांतच्या आत्महत्येनंतर काही न्यूज चॅनेलने मीडिया ट्रायल सुरु केले होते. यात अनेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. बॉलिवूडमध्ये खूप घाण आहे आणि ती साफ केली पाहिजे. बॉलिवूड ही जगातील सर्वात वाईट इंडस्ट्री आहे. ड्रग्ज घेण्यात अनेक मोठे कलाकार आघाडीवर आहेत, अशा प्रकारचा आरोप न्यूज चॅनेलकडून करण्यात आला होता. 

14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली, त्यानंतर ड्रग्ज प्रकरणावरुन बॉलिवूड चर्चेत आलं. बॉलिवूडमधील पार्ट्यांमध्ये कसे हमखास ड्रग्स केले जाते, हे सांगण्यात आले. तसेच यात अनेक कलाकारांची नावी न्यूज चॅनेलकडून घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर काही न्यूज चॅनेल विरोधात बॉलिवूड एकवटलं आहे. कायद्याचा भंग करणारे रिपोर्टिंग माध्यमांकडून झाले. यामुळे बॉलिवूडची बदनामी झाल्याचे म्हणत कोर्टाचे दार ठोठावण्यात आले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood filmmakers have filed a lawsuit in Court against 2 Top News Channels