संयुक्त राष्ट्रात सुधारणेची गरज; ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

pm modi
pm modi

नवी दिल्ली - दहशतवाद हीच जगासमोरची सर्वात मोठी समस्या असल्याचं आणि एकत्र येऊन याविरोधात लढा देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेत म्हटलं. दहशतवादाचं समर्थन करणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहिजे असंही मोदींनी सांगितलं. पुढच्या ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद भारताला सोपवण्यात येणार आहे. भारत 2021 मध्ये होणाऱ्या 13 व्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन करणार आहे. याआधी भारताना 2012 आणि 2016 मध्ये ब्रिक्स देशांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं होतं.

ब्रिक्सच्या बैठकीत चीनचे राष्ट्रपीत शी जिनपिंग, ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोल्सोनारो, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हेसुद्धा सहभागी होणार आहेत. भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्याची ब्रिक्स परिषद पार पडत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात लडाख मुद्यावरून तणाव आहे. दोन्ही देशांनी उंचावरील भागातून सैनिक मागे घेण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू केली आहे. 

जगभरातील संघटनांमध्ये ब्रिक्स एक प्रभावी संघटना मानली जाते. जगाच्या जवळपास अर्ध्या लोकसंख्येचं प्रतिनिधीत्व यामध्ये केलं जातं. ब्रिक्स देशांचे जीडीपी हा 16.6 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका आहे. 2021 मध्ये ब्रिक्स परिषदेला 15 वर्षे पूर्ण होतील. भारत याच्या अध्यक्षपदी असेल तेव्हा तीन स्तंभांमध्ये इंट्रा ब्रिक्सला मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल असंही मोदींनी सांगितलं.

हे वाचा - ट्रम्प यांनी समन्वय साधला नाही तर अनेक अमेरिकन मृत्यूमुखी पडतील - बायडेन

ब्रिक्स परिषदेत बोलताना मोदी म्हणाले की, दहशतवाद ही सध्या जगासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि मदत करणाऱ्या देशांना दोषी ठरवायला हवं आणि या समस्येविरुद्ध संघटीत होऊन लढायला हवं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषद आणि आयएमफ, डब्ल्यूटीओ सारख्या संघटनांमध्ये सुधारणांची गरज असल्याचंही यावेळी सांगितलं. 

आत्मनिर्भर भारत अभियानाबद्दलही मोदींनी ब्रिक्स परिषदेत काही मुद्दे मांडले. या मोहिमेंतर्गत एक व्यापक अशी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 'आत्मनिर्भर आणि लवचिक' भारत कोरोनानंतर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी फोर्स मल्टीप्लायर ठरू शकेल असा विश्वास आहे. जगासाठी भारत मोठं योगदान देऊ शकतो असंही मोदींनी म्हटलं. 

कोरोनाच्या संकट काळात भारतीय फार्मा उद्योगाच्या क्षमतेमुळे 150 हून अधिक देशांना औषधे पाठवली गेली. देशातील व्हॅक्सिन उत्पादन आणि पुरवठा कऱण्याची क्षमता ही जगासाठी नक्कीच उपयोगी पडेल असे मोदींनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com