BRS Party : ‘बीआरएस’ची महाराष्ट्रातील हवा गुल!

भारत राष्ट्र समिती (बीआरएस) राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार महाराष्ट्रासह कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश आदी राज्यांत करण्याचा प्रयत्न सुरू केला.
kcr
kcrsakal

आंध्र प्रदेशचे दहा वर्षांपूर्वी विभाजन झाले आणि तेलंगण या नव्या राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी प्रादेशिक अस्मितेचा विषय करून तेलंगण राष्ट्र समितीच्या माध्यमातून सत्ता काबीज केली. त्यानंतर दहा वर्षांत त्यांनी मोठी मजल मारली.

भारत राष्ट्र समिती (बीआरएस) राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचा विस्तार महाराष्ट्रासह कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश आदी राज्यांत करण्याचा प्रयत्न सुरू केला. महाराष्ट्रातील तेलंगणच्या सीमेवर राहणाऱ्या काही गावांतील नागरिकांनी तेलंगणच्या धर्तीवर सुविधा द्या किंवा आमच्या भागाचा समावेश तेलंगणमध्ये करा, अशी मागणी केली होती.

हा धागा पकडून ‘केसीआर’ यांनी विस्ताराची सुरवात महाराष्ट्रापासून केली आणि त्यासाठी नांदेड जिल्हा निवडला. ‘अब की बार, किसान सरकार’ असा जयघोष करीत त्यांनी तेलंगणमध्ये कल्याणकारी योजना कशा राबविल्या, याच पाढा वाचायला सुरवात केली. नांदेडसह परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर आदी भागांत सभा घेऊन त्यांनी विदर्भाकडे मोर्चा वळविला होता.

पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे पक्षाचे कार्यालय सुरू केले होते. त्यांचे लाघवी बोलणे आणि योजनांना भुलून महाराष्ट्रातील काही पदाधिकारी त्यांच्या पक्षाकडे आकृष्ट झाले. देशभरात पक्षाचा विस्तार करण्यासाठी स्वतःच्या तेलंगण राज्याकडे, मतदारांसोबतच पक्षाकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी पसरली आणि त्याचा फायदा कॉँग्रेसला मिळाला. त्यांची दहा वर्षांची सत्ता कॉँग्रेसने डिसेंबर २०२३ मध्ये उलथवून टाकली.

येथूनच त्यांच्या पक्षविस्ताराला खीळ बसली आणि सर्व काही शांत झाले. ‘बीआरएस’मध्ये गेलेले सैरभैर झाले. मराठवाड्यातील अनेक माजी आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आदींनी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला होता.

त्यामध्ये माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, प्रा. यशपाल भिंगे, सुरेश गायकवाड, अण्णासाहेब माने, संतोष माने, अभय पाटील चिकटगावकर, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, माणिक कदम, कदीर मौलाना व फेरोज पटेल आदींचा समावेश होता. माणिक कदम यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव पक्षात सक्रिय नाहीत.

‘मोटारी’चे टायर पंक्चर

बीआरएसचे निवडणूक चिन्ह मोटार असल्यामुळे सगळीकडे मोटारीची हवा पसरली होती. मात्र ‘केसीआर’यांचा होम ग्राउंडवर पराभव झाल्यामुळे मोटारीचे टायरच पंक्चर झाले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत ‘बीआरएस’मध्ये काही घडामोडी घडल्या. केसीआर आजारी होते, त्यांची मुलगी आमदार के. कविता यांना ईडीने अटक केली आहे.

त्यामुळे तेलंगणातीलच त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दुसरे पक्ष जवळ केले. महाराष्ट्रातदेखील त्याचे पडसाद उमटले. अनेकांनी दुसरे पक्ष जवळ केले, तर काही जण त्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बीआरएसची हवा गुल झाल्यातच जमा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com