कर्नाटकात पुन्हा 'कमळ' फुलणार; येडियुरप्पा होणार नवे मुख्यमंत्री

टीम ई-सकाळ
मंगळवार, 23 जुलै 2019

- मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी ठरले अपयशी. 

- भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांची निवड केली जाणार.

बंगळुरु : कर्नाटकात विश्वासदर्शक ठराव आज (मंगळवार) घेण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या जागी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा यांची निवड केली जाणार आहे.

कर्नाटक विधानसभेत आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास विश्वासदर्शक ठराव घेण्यात आला. या ठरावादरम्यान आमदारांची प्रत्यक्ष मोजणी घेण्यात आली होती. त्यानंतर मतदान घेण्यात आले. या मतदानादरम्यान 99 मतं सरकारच्या बाजूने तर 105 मतं सरकारविरोधात गेल्याने विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात कुमारस्वामी यांना अपयश आले. त्यामुळे आता ते आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा लवकरच देणार असून, आता त्यांच्याजागी येडियुरप्पा यांची निवड केली जाणार आहे.

दरम्यान, कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी करण्यासाठी भाजपकडून गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरु करण्यात आले होते. त्यानंतर आज विश्वासदर्शक ठरावात अपयश आल्याने सरकार अखेर कोसळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BS Yeddyurappa will be the Next CM of Karnataka