Bulli Bai : कॅन्सरमुळे आई, कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू; मुख्य आरोपी श्वेता आहे तरी कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bulli Bai case nepal connection

कॅन्सरमुळे आई, कोरोनामुळे वडिलांचा मृत्यू; मुख्य आरोपी श्वेता आहे तरी कोण?

नवी दिल्ली : बुल्ली बाई अॅपवरून (Bulli Bai Case) मुस्लीम महिलांची बदनामी केली जात होती. त्यांचे फोटो सोशल मीडियावरून चोरून बुल्ली बाई नावाने अपलोड केले जात होते. तसेच या फोटोंचा लिलाव व्हायचा. यापूर्वी सुल्ली डिल्सवरून (Sulli Deals) देखील असाच प्रकार सुरू होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police Probe Bulli Bai Case) मुख्य आरोपी श्वेता सिंह या १८ वर्षीय तरुणीला उत्तराखंडवरून ताब्यात घेतलं आहे. पण, ही तरुणी आहे तरी कोण?

हेही वाचा: Bulli Bai : महिलेकडून मुस्लीम महिलांची बदनामी, मुख्य आरोपी ताब्यात

मुंबई पोलिसांनी बुल्ली बाई प्रकरणी बंगळुरूवरून विशाल कुमार नावाच्या आरोपीला अटक केली. याच आरोपीने मुख्य आरोपीचे नाव उघड केले होते. त्यानुसार मुंबई पोलिसांनी श्वेता सिंहला उधमसिंह नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी 5 जानेवारीपर्यंत ट्रान्झिट रिमांडची मागणी केली. बुल्ली बाई प्रकरणाच्या मागे या १८ वर्षीय श्वेताचा हात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

कोण आहे मुख्य आरोपी श्वेता सिंह?

श्वेताने आई-वडिल दोघांनाही गमावलं आहे. कोरोनामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला, तर त्यापूर्वीच आई कॅन्सरमुळे गेली. ती घरात सर्वात मोठी असून कॉमर्समधून पदवी घेतली आहे. तिला एक लहान बहीण आणि एक लहान भाऊ आहे. दोघेही शाळकरी विद्यार्थी आहेत. आरोपी श्वेता ही अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तयारी करत होती. ती ट्विटरवर बनावट हँडल JattKhalsa07 बनवून वापर होती. द्वेषपूर्ण पोस्ट आणि आक्षेपार्ह फोटो आणि कमेंट्स अपलोड करण्यासाठी हँडलचा वापर केला जात होता. याबाबत इंडिया टुडेनं वृत्त दिलं आहे.

बुल्ली बाईचं नेपाळ कनेक्शन? -

मुख्य आरोपी श्वेता कथितपणे नेपाळमधील तिच्या मित्राच्या सूचनेनुसार काम करत होती. तपास पथकातील सूत्रांनी सांगितले की, आरोपींकडून गोळा केलेल्या प्राथमिक माहितीवरून असे दिसून आले आहे की नेपाळी नागरिक गियू तिला अॅप चालविण्यासाठी सूचना देत होता. याप्रकरणी त्या नेपाळी नागरिकाची काय भूमिका होती? याबाबत पोलिस तपास करत असल्याची माहिती आहे.

कोण आहे सहआरोपी विशालकुमार? -

मुंबई पोलिसांनी बंगळुरूवरून विशाल कुमार या इंजिनिअरींगच्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली होती. त्याची कसून चौकशी करण्यात आली असता त्याने मुख्य आरोपीचे नाव उघड केले. त्यानंतर मुख्य आरोपी असलेल्या तरुणीला ताब्यात घेण्यात आले. विशाल बुल्ली बाई अॅपवर महिलांचे फोटो एडीट करायचा आणि त्यानंतर ते फोटो अॅपवर अपलोड करत होता, अशी माहिती आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimemumbai police
loading image
go to top