esakal | CAA : आंदोलनाचा वणवा शमेना; दिल्लीत धग कायम, तर दक्षिणेत 'अशी' आहे स्थिती!
sakal

बोलून बातमी शोधा

CAA-2019

विद्यार्थ्यांनी जामियाबाहेर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली. अनेक भागांमध्ये सुरक्षा दलांनी ध्वजसंचलनदेखील केले. ​

CAA : आंदोलनाचा वणवा शमेना; दिल्लीत धग कायम, तर दक्षिणेत 'अशी' आहे स्थिती!

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (Ciizenship Amendment Act) निषेधार्थ देशभर भडकलेला आंदोलनाचा वणवा शुक्रवारी (ता.20) आणखी तीव्र झाला. राजधानी दिल्लीसह, उत्तर प्रदेशातील सतरा शहरांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. भारत

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राजधानी दिल्लीतील तेरा मेट्रो स्थानके बंद 

दिल्लीप्रमाणेच यूपीत काही भागांत इंटरनेट सेवा थांबविण्यात आली असून, अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्येही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये शुक्रवारी (ता.20) अनेक ठिकाणांवर जोरदार आंदोलने झाली. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. 

दर्यागंजमध्ये आंदोलनास हिंसक वळण

देशभरातील या जन उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्राने नमती भूमिका घेत नागरिकत्व कायद्यामध्ये सुधारणा करण्याची तयारी दर्शविली असून, यासाठी आंदोलकांकडून सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. राजधानी दिल्लीतील दर्यागंज परिसरामध्ये सायंकाळी आंदोलनास हिंसक वळण लागले. या वेळी काही आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ केली, आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला.  

जामा मशीद आंदोलनाचा केंद्रबिंदू

तत्पूर्वी, दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशीद शुक्रवारी (ता.20) या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरली. शुक्रवारचा दिवस हा प्रार्थनेचा असल्याने सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. या वेळी पोलिसांनी आझाद यांना जामा मशिद आणि नंतर दर्यागंज येथून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलकांनीच मोठ्या शिताफीने त्यांची सुटका करविली.

आंदोलकांकडून पोलिसांना पुष्पगुच्छ

या वेळी आंदोलकांनी नागरिकत्व कायद्याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जामियाप्रमाणेच दिल्लीतील अनेक शैक्षणिक संस्थांमध्येही आज आंदोलन झाले. विद्यार्थ्यांनी जामियाबाहेर तैनात पोलिस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली. अनेक भागांमध्ये सुरक्षा दलांनी ध्वजसंचलनदेखील केले. या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर केरळमध्येही वायनाड, कोझीकोड, कासारगोड आणि कन्नूरमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आसाममध्ये दहा दिवसांनंतर इंटरनेट सुरू

दरम्यान कर्नाटकमध्येही स्थानिक पोलिसांनी आज काही केरळी नागरिकांची धरपकड केली. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले आहे. ईशान्येकडील बहुतांश राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असून, आसाममधील इंटरनेट सेवा आज पूर्ववत झाली. मेघालयातील तणावही कमी होऊ लागला आहे. 

उत्तर प्रदेशात आंदोलनाचा वणवा 

उत्तर प्रदेशात सतरा जिल्ह्यांमध्ये आज तीव्र आंदोलन झाले, मोरादाबाद, सीतापूर, बहराईच, बिजनौर, गोरखपूर आणि फिरोजाबादमध्ये आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ करत पोलिसांवर तुफान दगडफेक केली. वीस जिल्ह्यांमध्ये इंटरनेटसेवा बंद करण्यात आली असून, काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

गाझियाबाद, मेरठ, सुलतानपूर, गोरखपूर, कानपूर, उन्नाव, बुलंदशहर, हाथरस, हापूड, अमरोहा, मुझफ्फरनगर आदी ठिकाणांवर आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या आंदोलनप्रकरणी उत्तर प्रदेशात दीडशे जणांना अटक करण्यात आली आहे. दक्षिणेत कर्नाटकमध्ये कोडागू येथे संचारबंदी लागू करण्यात आली होती.