पीकविमा योजना आता ऐच्छिक ; मंत्रिमंडळ निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देताना पीकविमा योजना ऐच्छिक केली आहे. कृषी कर्जावरील व्याजदरात केंद्राकडून दिली जाणारी सूट २ टक्‍क्‍यांवरून २.५ टक्के करण्यात आली आहे. याचा फायदा ९५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना होईल.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देताना पीकविमा योजना ऐच्छिक केली आहे. कृषी कर्जावरील व्याजदरात केंद्राकडून दिली जाणारी सूट २ टक्‍क्‍यांवरून २.५ टक्के करण्यात आली आहे. याचा फायदा ९५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना होईल. दरम्यान, ईशान्य भारतातील शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजनेचा ९० टक्के प्रीमियम केंद्र सरकार देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाढत्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने पीकविमा योजनेतील बदलाला मंजुरी दिली. आता ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असेल. पिकांचा विमा काढायचा की नाही, याचा निर्णय शेतकरी स्वतः करू शकेल. सरकारने दुग्धोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ४,५८८ कोटी रुपयांच्या डेअरी प्रक्रिया आणि पायाभूत सुविधा विकास निधी योजनेला मंजुरी दिली. ही योजना धवलक्रांतीला नवा आयाम जोडणारी असेल. यामध्ये ९५ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. 

याअंतर्गतच कृषी कर्जावरील व्याजदरात सूट २ टक्‍क्‍यांवरून २.५ टक्के करण्यात आली आहे. यासाठी ११,१८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासोबतच आर्थिक सुधारणांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी उत्पन्न संघटनांची स्थापना करून त्यांना प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे. त्याअंतर्गत येत्या पाच वर्षांत १० हजार कृषी उत्पन्न संघटनांची अर्थात फार्म प्रोड्यूस ऑर्गनायझेशनची (एफपीओ) स्थापना केली जाईल. त्यासाठी ४,४९६ कोटी रुपये खर्च येईल. मंत्रिमंडळाने या योजनेला हिरवा कंदील दाखवला. 

दोन विधेयकांच्या मसुद्याला मंजुरी 
दरम्यान, २२व्या विधी आयोगाच्या नियुक्तीला आणि सहायक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) विधेयकांच्या मसुद्यालादेखील आज मंजुरी देण्यात आली. ही विधेयके संसदेच्या याच अधिवेशनात मांडली जाणार आहेत. सहायक प्रजनन तंत्रज्ञान (नियमन) विधेयकात महिलांच्या प्रजनन अधिकाराच्या संरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत राष्ट्रीय नोंदणी प्राधिकरण तयार करण्याचा प्रस्ताव आहे. या प्राधिकरणाकडे नोंदणी करणे सर्व उपचारपद्धतींच्या डॉक्‍टरांसाठी आणि तंत्रज्ञांसाठी आवश्‍यक असेल. केंद्रीय डेटाबेस तयार करणे, राष्ट्रीय आणि राज्यपातळीवर महामंडळाची स्थापना करणे, या तरतुदीदेखील प्रस्तावित विधेयकात आहेत. 

नव्या विधी आयोगाची होणार स्थापना 
नवा विधी आयोग सरकारला गुंतागुंतीच्या कायदेशीर मुद्द्यांवर सल्ला देईल. या आयोगाचा कार्यकाळ या वर्षी ऑगस्टमध्ये संपुष्टात येत असून, मंत्रिमंडळाच्या संमतीनंतर नव्या विधी आयोगासाठी कायदा मंत्रालयातर्फे अधिसूचना काढण्यात येईल. नव्या विधी आयोगाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. तसेच, उघड्यावरील शौच प्रथेच्या मुक्तीसाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोनलाही मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. 

पीकविमा योजना ऐच्छिक करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या योजनेचा आत्तापर्यंत ५.५ कोटी लोकांना फायदा झाला आहे. तब्बल १३ हजार कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला असून, सात हजार कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली. 
- नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषिमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cabinet decision Crop insurance plans are now optional