खोटं बोलण्यात मोदींची बरोबरी कधीही करु शकणार नाही- राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 28 October 2020

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत.

नवी दिल्ली- बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत. खोटं बोलण्याच्या बाबतीत मी पंतप्रधान मोदींशी कधीही बरोबरी करु शकणार नाही, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. ते बिहारमध्ये एका सभेला संबोधित करत होते.  
काँग्रेसने देशाला एक नवीन दिशा दिली आहे. मनरेगा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. आम्हाला माहिती आहे की देश कसा चालवायचा. आम्ही शेतकऱ्यांसोबत उभे राहिलो आहोत आणि रोजगार निर्मिती कसं करायचं हे आम्हाला माहित आहे. पण, एका गोष्टीची आमच्यात कमी आहे. आम्ही खोटं बोलू शकत नाही. आम्ही खोटं बोलण्यात पंतप्रधान मोदींशी बरोबरी करु शकत नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. 
 
पंतप्रधान मोदी आता आपल्या भाषणात 2 कोटी रोजगार देण्याचा उल्लेख करत नाहीत. त्यांना माहिती आहे की ते खोटं बोलत आहेत. लोकांनाही माहिती आहे की मोदी खोटं बोलत आहेत. मी खात्री देतो, पंतप्रधान मोदी येथे येऊन दोन कोटी नोकऱ्या देण्याचे म्हणतील, तर लोक त्यांना सोडणार नाहीत, अशी टीका राहुल यांनी केली. 

नवजात बाळाचा मृतदेह सापडल्याने महिलांना विमानातून उतरवून केली तपासणी

बिहारमध्ये पुरेसे जॉब निर्माण झाले नाहीत, सुविधा नाहीत. पण, यात तुमचा काही दोष नाही. दोष तुमचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा आहे. लोक बिहारमधून दिल्लीमध्ये कामाच्या शोधात जात आहेत. तुम्ही बिहार मेट्रोमध्ये काम का करत नाही? कारण तुमच्या राज्यात मेट्रो नाही, असं राहुल गांधी म्हणाले. सर्वसाधारणपणे दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळण्यात येतो. पण पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी, अंबानी, अदाणीचे पुतळे जाळण्यात आले. या मागे कारण काय असावं? ही खूप मोठी आणि दु:खद गोष्ट आहे की हे सर्व भारताच्या पंतप्रधानांसोबत होत आहे.  

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत 71 जागांसाठी 1066 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. बिहारमध्ये यंदा एनडीए आणि महाआघाडी यांच्यात लढत होत आहे. पहिल्या टप्प्यात 2.14 कोटी मतदार आपला अधिकार बजावतील. यामध्ये 1.01 कोटी महिला तर 599 तृतीयपंथी आहेत. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये 952 पुरुष आणि 114 महिला आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cant compete with PM modi in lying said Rahul Gandhi