अमरिंदर सिंग यांच्यानंतर पंजाबचा 'कॅप्टन' कोण? दोन नावे चर्चेत

अमरिंदर सिंग यांच्यानंतर पंजाबचा 'कॅप्टन' कोण? दोन नावे चर्चेत

Summary

माझा सकाळीच निर्णय झाला होता. मी आज राजीनामा देत असल्याचं काँग्रेस नेत्यांना सांगितलं अशी माहिती कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली.

पंजाबमध्ये राजकीय भूकंप झाला असून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता पंजाबचा कॅप्टन कोण याची चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार दोन पर्यवेक्षक काँग्रेस आमदारांची बैठक घेत आहेत. एका बाजुला बैठक सुरु असतानाच अमरिंदर सिंग यांनी राजभवनावर जात राज्यपालांकडे राजीनामा सोपवला. सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचंही समजत आहे.

राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितलं की, काँग्रेसमध्ये गेल्या दोन महिन्यात खुपवेळा अपमान झाला. मी राजीनामा दिला आहे आता तुमचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना मुख्यमंत्री करा. माझा सकाळीच निर्णय झाला होता. मी आज राजीनामा देत असल्याचं काँग्रेस नेत्यांना सांगितलं अशी माहिती कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली.

अमरिंदर सिंग यांच्यानंतर काही नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. यामध्ये काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. यात माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड यांचे नाव समोर येत आहे. तसंच काँग्रेस जर पुन्हा शिख चेहराच देणार असेल तर अमरिंदर सिंग यांच्यासोबत वाद असलेले आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचे नाव घेतले जात आहे. दरम्यान, पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असंही म्हटलं जात आहे.

अमरिंदर सिंग यांच्यानंतर पंजाबचा 'कॅप्टन' कोण? दोन नावे चर्चेत
पंजाबमध्ये राजकीय भूकंप; मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा

सुनिल जाखड हे एक हिंदू नेते आहेत. जाखड हे अबोहरमधील पंजकोसी गावचे आहेत. त्यांचे वडील बलराम कुमार जाखड हे दिग्गज काँग्रेस नेते होते. त्यामुळे काँग्रेसच्या एकनिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचं नाव आहे. जाखड २००२ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर सलग तीन वेळा त्यांनी आमदारकी जिंकली आहे. इतकंच काय त्यांनी २०१७ मध्ये भाजपच्या गडाला सुरुंग लावत गुरदासपूरमध्ये लोकसभेला बाजी मारली होती. त्यांनी गुरदासपूरमध्ये भाजपचे उमेदवार विनोद खन्ना यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जिंकली होती. यात त्यांनी भाजपच्या स्वर्ण सलारिया यांना पराभूत केलं होतं. मात्र २०१९ च्या निवडणुकीत सनी देओलने जाखड यांना पराभूत केलं. जाखड हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तींयापैकी एक मानले जातात.

अमरिंदर सिंग यांच्यानंतर पंजाबचा 'कॅप्टन' कोण? दोन नावे चर्चेत
मोदींनी मंत्रिमंडळातून काढलं; नाराज खासदाराचा तृणमूलमध्ये प्रवेश

नवज्योत सिंग सिद्धू यांचेही नाव मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत आहे. सिद्धू यांच्या गटातील आमदार आणि मंत्री अनेकदा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची मागणी करताना दिसले आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी वादानंतर काँग्रेसने सिद्धू यांना उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. पण सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. त्यानंर सिद्धूंची वर्णी प्रदेशाध्यक्षपदी लागली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com