
CBI चा छापा पडला अन् तेजस्वी यादवांना पहाटेचा शपथविधी आठवला; म्हणाले, "अजित पवार..."
बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी सीबीआयने दोन दिवसांपूर्वी छापा टाकला होता. यावरुन आता बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राबडी देवींचे पुत्र तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांचं उदाहरण देत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या रेल्वेमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये नोकरी लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीआयकडून छापे टाकण्यात आले आहेत. बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन करताना आपल्याला याचा अंदाज आला होता, असं विधानही तेजस्वी यादव यांनी सांगितलं.
याप्रकरणी माध्यमांशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, "महागठबंधन सरकारने विश्वासदर्शक ठराव झाल्यावर सांगितलं होतं की या गोष्टी होतच राहणार. पण भ्रष्टाचाराचे आरोप असलेला नेता भाजपात गेला की त्याच्यावरचे सगळे गुन्हे मागे घेतले जातात. "
हे सांगताना तेजस्वी यादव यांनी अजित पवारांचंही उदाहरण दिलं आहे. तेजस्वी यादव म्हणाले, "भाजपासोबत गेलात तर तुम्ही राजा हरिश्चंद्र व्हाल. महाराष्ट्रात शरद पवारांचे पुतणे भाजपासोबत गेले तेव्हा ईडीने गुन्हे मागे घेतले होते. तृणमूल काँग्रेसचे मुकुल रॉय जेव्हा भाजपात गेले तेव्हा त्यांच्यावरचे सगळे गुन्हे मागे घेण्यात आले होते. भाजपाला आरसा दाखवला किंवा प्रश्न विचारला की असे प्रकार होतच राहणार."