काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार यांच्या घरावर सीबीआयची धाड, 14 ठिकाणांवर छापे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

सीबीआयने कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या 14 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली आहे.

बंगळुरु- सीबीआयने कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या 14 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली आहे. शिवकुमार यांचे बंधू खासदार डी के सुरेश यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये 9, दिल्लीत 4 आणि मुंबईतील एका ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. सीबीआयने याप्रकरणी शिवकुमार यांच्यासह इतरांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. 

डी के शिवकुमार आणि त्यांचे बंधू डी के सुरेश यांच्याविरोधात उत्पन्नाहून अधिक संपत्ती संपादित केल्याचा आरोप आहे. उत्पन्नाहून अधिक संपत्ती संपादित केल्याप्रकरणी शिवकुमार मागील 2 वर्षांपासून ईडी आणि प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. मागील वर्षी ईडीने शिवकुमार यांना मनी लाँड्रिगप्रकरणी अटकही केले होते. सरकारने हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवले होते. त्यानंतर सोमवारी या धाडी पडत आहेत. 

शिवकुमार यांनी अनेकवेळा काँग्रेससाठी संकटमोचकाची भूमिका निभावली आहे. डीके नावाने ओळखले जाणाऱ्या शिवकुमार यांना 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चे जनक मानले जाते. 

हे वाचा - बिहार - RJD ला मोठा धक्का; माजी नेत्याच्या हत्येनंतर तेजस्वीसह 6 जणांविरोधात FIR

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार वाचवण्यासाठी शिवकुमार यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. तेव्हापासून त्यांचे पक्षांतर्गत महत्त्व वाढले होते. त्यांनी आघाडी मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cbi Raids At The 14 Premises Of Karnataka Congress Chief Dk Shivakumar