बिहार - RJD ला मोठा धक्का; माजी नेत्याच्या हत्येनंतर तेजस्वीसह 6 जणांविरोधात FIR

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यातच राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे.

पूर्णिया - बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यातच राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे. आऱजेडीचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्येप्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी नेते शक्ती मलिक यांच्या कुटुंबियांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव, अनिल कुमार साधू पासवान, कालो पासवान यांच्यासह सहा जणांवर कट रचून हत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी केहट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पूर्णियाचे पोलिस अधीक्षक विशाल शर्मा यांनी याची माहिती दिली. 

आरजेडी माजी नेते शक्ती मलिक यांची रविवारी सकाळी गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शक्ती यांची पत्नी खुशबू देवी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यामध्ये खुशबू यांनी तेजस्वी यादव यांच्यासह सहा जणांवर आरोप केला आहे. या लोकांकडून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती असंही खुशबू यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

हे वाचा - चिराग पासवान हे भारतीय जनता पक्षाच्या हातातील खेळणे; काँग्रेसची टीका

शक्ती मलिक यांना रविवारी पहाटेच्या सुमारास तोंडाला कापड बांधलेल्या तिघांनी घरात घुसून मारले. गोळीबार करून मारेकरी तिथून फरार झाले. त्यावेळी घरात मुले, पत्नी आणि ड्रायव्हर होते. गोळीबारानंतर जखमी झालेल्या शक्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी शक्ती यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: FIR registered against six people including tejaswi yadav in Shakti Malik murder case