esakal | हाथरस प्रकरणी सीबीआईने दाखल केला गुन्हा, तपास सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

hathras main.jpg

सीबीआयने चारही आरोपींविरोधात हत्या आणि सामूहिक बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हाथरस प्रकरणी सीबीआईने दाखल केला गुन्हा, तपास सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गाझियाबाद- हाथरस प्रकरणी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. याचदरम्यान शनिवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. रविवारी (दि.11) सीबीआयने गाझियाबाद शाखेत हाथरसप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने चारही आरोपींविरोधात हत्या आणि सामूहिक बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लखनौ येथील विभागीय कार्यालयाच्या निगराणीत गाझियाबाद शाखा या प्रकरणाची चौकशी करेल. 

विरोधकांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी राज्याचे अप्पर मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना पीडित कुटुंबीयांना भेटण्यास पाठवले होते. दोन्ही अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी सीबीआय चौकशीची शिफारस करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी विरोधकांनी मुख्यमंत्र्याच्या शिफारशीवर सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर शनिवारी याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली होती. 

हाथरस प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून घेण्यास केलेला उशीर, पीडित तरुणीच्या कुटुंबावर टाकण्यात आलेला दबाव, कुटुंबाला भेटण्यापासून मीडियाला रोखणे, अशा अनेक प्रकारांमुळे उत्तर प्रदेश पोलिसांच्या भूमिकेकडे बोट केले जात होते. पीडित तरुणीचे पोलिसांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्यामुळे देशभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. 

हेही वाचा- Bihar Election : असाही एक चहावाला; हटके पद्धतीने मतदानाविषयी करतोय जागृती

केंद्रातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याने प्रकरण आणखी तापले होते. देशभरातून टीका झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.