Bihar Election : असाही एक चहावाला; हटके पद्धतीने मतदानाविषयी करतोय जागृती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

बिहारचा हा चहावाला कोणत्याही पक्षाचा नाहीये. परंतु, लोकांमध्ये मतदानासाठी जागृती करण्यासाठी या चहावाल्याने अनोखा असा उपाय आजमावला आहे. 

मुझफ्फरपुर : बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आली आहे, तससता  प्रचाराचा माहोल गरमागरम होत आहे. कोरोना काळात भारतात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. सोशल डिस्टंन्सिगचे पालन करत इतक्या मोठ्या लोकसंख्येकडून मतदानाची प्रक्रिया पार पाडणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हानच आहे. सर्व नियम पाळून लोकांना मतदानासाठी प्रोत्साहीत करणे आवश्यक आहे. यासाठीच हटके पद्धतीने मतदानाबाबत जागृती करणारा एक चहावाला सध्या बिहारमध्ये चर्चेत आहे. बिहारचा हा चहावाला कोणत्याही पक्षाचा नाहीये. परंतु, लोकांमध्ये मतदानासाठी जागृती करण्यासाठी या चहावाल्याने अनोखा असा उपाय आजमावला आहे. 

बिहारच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत हा चहावाला लोकांना आपल्या मतदानाच्या हक्काविषयी आणि कर्तव्याविषयी जागृत करण्याचे काम करत आहे. मतदानाविषयी जागृती करण्यासाठी हा चहावाला आपल्या कपड्यांवर संदेश लिहून रस्त्यावरून फिरत लोकांना चहा पाजत आहे. 

हा चहावाला लोकांना फक्त चहा पाजत नाहीये तर लोकांना कोरोनाच्या महामारीत मतदान करताना काय काळजी घ्यावी हेही सांगत आहे. कोरोना असला तरीही मतदान करणे किती गरजेचे आहे, हे सांगत आहे. या माध्यमतून हा चहावाला चहा तर विकत आहेच सोबतच लोकांना मतदानाविषयी जागरुक देखील करत आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीचे पहिल्या टप्प्याचे मतदान 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. अशातच हा चहावाला आपल्या अनोख्या मार्गाने लोकांमध्ये चर्चेत आहे. विशेष म्हणजे प्रबोधनासाठी निवडलेली वाट लोकांना आवडत असल्याने लोक त्याच्याकडे उत्साहाने चहादेखील घेत आहेत. 

या चहावाल्याने आपल्या कपड्यांवर लिहलंय की, मतदान केंद्र आपल्यासाठी आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये. चहाविक्रेत्याचं म्हणणं आहे की लोकांना त्यांच्या हक्काप्रती जाणीव व्हावी म्हणून मी माझ्या शर्टवर हा संदेश लिहला आहे. लोकांनी आपल्या मतदानाचे कर्तव्य बजावायला हवे. बिहार विधानसभेच्या निवडणुका 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात होणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tea seller in bihar spreading awareness about voting right