न्यायालयाचा अपमान केलात.. आता दिवसभर कोपऱ्यात बसा! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून एका अधिकाऱ्याची बदली करणारे 'सीबीआय'चे हंगामी संचालक एम. नागेश्‍वर राव यांना आज (मंगळवार) न्यायालयाने दिवसभर कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे नागेश्‍वर राव यांनी बिनशर्त माफी मागितली. 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून एका अधिकाऱ्याची बदली करणारे 'सीबीआय'चे हंगामी संचालक एम. नागेश्‍वर राव यांना आज (मंगळवार) न्यायालयाने दिवसभर कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे नागेश्‍वर राव यांनी बिनशर्त माफी मागितली. 

मुझफ्फरनगर दंगलीच्या प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी ए. के. शर्मा यांची 'सीआरपीएफ'मध्ये बदली करण्यात आली होती. या बदलीसाठी सर्वोच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. सीबीआयच्या संचालकांच्या नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादामुळे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही अधिकाऱ्याच्या बदलीसाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे नागेश्‍वर राव यांनी कालच बिनशर्त माफी मागितली होती. 

अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये जास्तीत जास्त सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा असते. नागेश्‍वर राव यांची बाजू मांडताना ऍटर्नी जनरल के. के. वेणूगोपाळ यांनी 'हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार नाही. नागेश्‍वर राव यांच्या 32 वर्षांच्या कारकिर्दीत असा प्रकार घडलेला नाही. त्यांनी माफी मागितली आहे', असे सांगितले. 

यावर सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले, 'राव यांच्या कृतीमुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे. या अवमानासाठी एक लाख रुपयांचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत एका कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा सुनावली जात आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBIs M Nageswara Rao Guilty Of Contempt Supreme Courts Unusual Punishment