महाराष्ट्राला २६८ कोटींची मदत; ‘निसर्ग’च्या हानीमुळे सहा राज्यांना ४३८१ कोटी रुपये मंजूर

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 14 November 2020

अम्फान चक्रीवादळ, पूर आणि दरड कोसळणे या नैसर्गिक आपत्ती झेलणाऱ्या पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि सिक्कीम या राज्यांनाही अर्थसहाय्य मंजूर झाले आहे.  

नवी दिल्ली - निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात झालेल्या हानीच्या भरपाईसाठी केंद्राकडून २६८ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. याव्यतिरिक्त अम्फान चक्रीवादळ, पूर आणि दरड कोसळणे या नैसर्गिक आपत्ती झेलणाऱ्या पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि सिक्कीम या राज्यांनाही अर्थसहाय्य मंजूर झाले आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने महाराष्ट्रासह सहा राज्यांना एकूण ४३८१.८८ कोटी रुपये मंजूर केले. मे मध्ये पूर्व किनारपट्टीवर आलेल्या अम्फान चक्रीवादळाचा तडाखा झेलणाऱ्या पश्चिम बंगालला २७०७.७७ कोटी, तर ओडिशासाठी १२८.२३ कोटी रुपये मिळणार आहेत. तर निसर्ग चक्रीवादळाचा मुकाबला करणाऱ्या महाराष्ट्राला २६८.५९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कोकण किनारपट्टीवर निसर्गने थैमान घातले होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात पूर आणि दरड कोसळण्याने झालेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकसाठी ५७७.८४ कोटी रुपये तर सिक्कीमसाठी ८७.८४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याशिवाय, या आर्थिक वर्षात केंद्राकडून आतापर्यंत राज्यांना एसडीआरएफमध्ये (राज्य आपत्ती प्रतिसाद निधी) १५,५२४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अम्फान चक्रीवादळानंतर पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगाल आणि ओडिशाचा दौरा केला होता. त्यानंतर पश्चिम बंगालला १००० कोटी रुपये तर ओडिशाला ५०० कोटी रुपयांचे साहाय्य करण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Center government will provide Rs 268 crore to compensate for the damage caused by the cyclone in Maharashtra