esakal | केंद्र सरकार सैन्यासोबत की चीनबरोबर?;राहुल गांधी यांची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

rahul-gandhi

चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काल लोकसभेत दिलेल्या निवेदनानंतर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना, मोदींनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता.

केंद्र सरकार सैन्यासोबत की चीनबरोबर?;राहुल गांधी यांची टीका

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - मागील सहा महिन्यात भारतीय सीमेमध्ये घुसखोरी झाली नसल्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या उत्तरावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा सरकारला घेरले असून, मोदी सरकार भारतीय सैन्यासोबत आहे की चीन सोबत आहे?, असा खोचक सवालही केला आहे. दरम्यान, राज्यसभेत उद्या संरक्षण मंत्री राजनाथसिंह चीनशी सुरू असलेल्या सीमावादावर निवेदन करतील. आज राज्यसभेतील विरोधी पक्षांशी अनौपचारिक चर्चेनंतर ही माहिती देण्यात आली. 

चीनशी सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी काल लोकसभेत दिलेल्या निवेदनानंतर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करताना, मोदींनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला होता. तसेच चीनने बळकावलेली आपली जमीन परत कधी मिळविणार अशी विचारणाही त्यांनी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मोदींवर राहुल यांनी नव्याने प्रहार केला. 

आधी पंतप्रधानांनी म्हटले भारतीय सीमेमध्ये कोणीही शिरले नाही. त्यानंतर चीनमधील बॅंकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले. (आता) गृह राज्यमंत्री म्हणतात की अतिक्रमण झालेलेच नाही. मोदी सरकार भारतीय सैन्यासोबत आहे, की चीनसोबत? एवढी भीती कसली?, असे डिवचणारे ट्विट राहुल यांनी केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, चीन प्रकरणावरून सरकारविरोधात आक्रमक असलेल्या काँग्रेसने चिनी कंपनीद्वारे भारतीय नेते, संस्थांवर पाळत ठेवली जाण्याच्या घटनेवरून सरकारला जाब विचारला. राज्यसभेत के. सी. वेणुगोपाल आणि राजीव सातव तर, लोकसभेमध्ये अधीर रंजन चौधरी आणि के. सुरेश या खासदारांनी हा मुद्दा उपस्थित केला. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तत्पूर्वी, काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकार परिषदेत चिनी बॅंकेकडून सरकारने घेतलेल्या कर्जाचा मुद्दा उपस्थित करून सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले. लडाखमध्ये चीनशी तणाव असताना सरकारचे प्रतिनिधी दुटप्पीपणे माहिती देत असल्याचा आरोप करताना पवन खेडा यांनी सांगितले, की चीनमध्ये असलेल्या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेन्ट बॅंकेकडून भारत सरकारने ८ मे रोजी ५० कोटी डॉलर आणि १९ जूनला ७५ कोटी डॉलर कर्ज घेतले. याच दिवशी पंतप्रधान मोदींनी चीनला क्लिनचिट दिली होती, असा टोलाही खेडा यांनी लगावला. एकीकडे जनतेला चीनवर बहिष्कार करण्यासाठी सांगितले जाते पण दुसरीकडे मोदी सरकार चीनकडून पैसे घेते. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेन्ट बॅंकेतील सर्वात मोठा गुंतवणूकदार चीन आहे हे सरकारला माहीत नाही काय?, असा सवालही पवन खेडा यांनी केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप