
चार्जिंग पॉइंटसाठी केंद्र सरकार ‘चार्ज’
नवी दिल्ली : मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यातील सहा शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग पॉइंट सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पेट्रोलियम पदार्थांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण असले तरी, ग्रामीण भागापर्यंत चार्जिंग पॉइंटची सुविधा पोहोचत नाही तोपर्यंत या धोरणाला गती येणार नाही, असे निरीक्षण व्यक्त केले जात आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सुलभपणे चार्जिंगची सुविधा विकसित करण्याचे तंत्र शोधून काढण्यासाठी केंद्राने पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच ‘एआरएआय’ या संस्थेला जबाबदारी दिली आहे.
पुण्याच्या या संस्थेकडून नोव्हेंबर -डिसेंबर २०२२ पर्यंत असे तंत्र विकसित करण्यात येईल, असा विश्वास केंद्र सरकारला आहे. राज्यसभेत नुकत्याच झालेल्या चर्चेत, देशातील ७० हजारपैकी २२ हजार पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी नमूद केले. यात महाराष्ट्रामध्ये मुंबई, नागपूर, पुणे, नगर, नाशिक, नवी मुंबई येथे इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यावर काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी, जोपर्यंत ग्रामीण भागापर्यंत चार्जिंगची सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण गतिमान होणार नाही, असे सांगितले. अनेक सदस्यांनी त्यांच्या म्हणण्याची सहमती दर्शवली. मात्र, तूर्तास मुख्य राष्ट्रीय महामार्ग आणि मोठ्या शहरांमध्ये ही सुविधा सुरू करून त्यानंतर ग्रामीण भागात तिचा विस्तार करण्यात येईल, असे पांडे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: "हेलिकॉप्टर अपघातातून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची प्रकृती गंभीर"
केंद्राचा पुढाकार
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने ‘फेम’ ही योजना सुरु केली आहे. इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट सुरू करण्यासाठी १८ हजार कोटींची तरतूद करून त्यातील एक हजार कोटी रुपये तातडीने देण्यात आल्याचे केंद्राने म्हटले आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या ६२ हजारांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देण्याची घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक बस तसेच कार खरेदीवर देखील सरकार सबसिडी देईल, असे गडकरी यांनी नुकतेच सांगितले होते. देशभरातील २२ हजार पेट्रोलपंपांवर तातडीने चार्जिंग पॉइंट सुरू करण्याच्या योजनेवर गडकरी यांनी धडाकेबाजपणे कामही सुरू केले आहे.
असे असतील चार्जिंग पॉइंट
२८७७ -६८ शहरांमध्ये
१५७६ -१६ महामार्गांवर
१ चार्जिंग पॉइंट- शहरांत ३ किमीमागे
Web Title: Central Government Charges For Charging Points
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..