बिहारच नव्हे तर संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस, केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

इतर राज्यातील नागरिक बांगलादेशातून आले आहेत का, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता.

भुवनेश्वर- सत्ता बिहारवासियांना मोफत कोरोनाची लस देणार असल्याचे जाहीरनाम्यात आश्वासन दिल्यापासून देशात भाजपवर सर्वच विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे. राजकीय फायद्यासाठी कोरोनासाथीचा वापर केला जात असल्याचा भाजपवर आरोप करण्यात  आला आहे. परंतु, मोदी सरकारमधील एका मंत्र्याने कोरोनावरील लस देशातील सर्व नागरिकांना मोफत देणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी हे बालासोर येथे प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. त्यांनी कोरोनावरील लस देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत देणार असल्याचे सांगितले.  

बालासोर येथे 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यानिमित्त आयोजित प्रचारसभेनंतर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना कोविड-19 ची लस मोफत उपलब्ध करुन देणार असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीला लस देण्यासाठी सुमारे 500 रुपयांचा खर्च येणार असल्याचेही त्यांनी म्हटले. 

हेेही वाचा- Bihar Opinion Poll: सत्तेची चावी कुणाकडे, नितीशकुमार की तेजस्वी यादव ?

तत्पूर्वी, ओडिशा सरकारमधील आरोग्य मंत्री आर पी स्वॅन यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि प्रताप सारंगी यांच्यावर मोफत कोविड-19 लसीवरुन निशाणा साधला होता. बिहारमध्येच ही लस मोफत देणार का, याचे उत्तर या दोन्ही मंत्र्यांनी द्यावे, असा सवाल त्यांना विचारला होता. त्यानंतर प्रताप सारंगी यांनी संपूर्ण देशालाच मोफत लस देणार असल्याचा दावा केला. 

हेही वाचा-चीनने जमीन बळकावल्याचं सत्य भागवत जाणतात, पण...; राहुल गांधींची टीका

दुसरीकडे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बिहारला मोफत लस देण्याच्या भाजपच्या आश्वासनावरुन टीका केली होती. इतर राज्यातील नागरिक बांगलादेशातून आले आहेत का, असा सवाल त्यांनी केला होता. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजपच्या या आश्वासनाचा समाचार घेतला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central government will provide corona vaccine to all the citizens of the india for free says pratap sarangi