केंद्रीय मंंत्रीच म्हणतात, 'वंदेमातरम् म्हणा, नाही तर देशाबाहेर व्हा'

टीम ई-सकाळ
Sunday, 22 September 2019

काँग्रेसची ही भूमिका राष्ट्रविरोधी असल्याचे सांगत, जे वंदेमातरम स्वीकारत नाहीत. त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी व्यक्त केले आहे.

भुवनेश्वर : केंद्र सरकारने काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द केल्यानंतर त्याला काँग्रेसने विरोध केला. यावरून आता केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेसची ही भूमिका राष्ट्रविरोधी असल्याचे सांगत, जे वंदेमातरम स्वीकारत नाहीत. त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य सारंगी यांनी व्यक्त केले आहे. काश्मीर संदर्भात घेतलेला निर्णय कसा योग्य आहे, हे सांगण्यासाठी भाजपच्यावतीने देशभरात मोहीम राबवली जात आहे. त्यात ठिकठिकाणी जनजागरण सभा आयोजित करण्यात येत आहेत.

सत्ताधाऱ्यांनो ‘चले जाव’; शरद पवारांचा नारा

काय म्हणाले सारंगी?
भुवनेश्वर येथील जन जागरण सभेत केंद्रीय मंत्री सारंगी म्हणाले, ‘जेव्हा केंद्र सरकारने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कट्टर विरोधी पक्षांनीही सरकारच्या या निर्णयाचे समर्थन केले. पण, काँग्रेसने त्याला आक्षेप घेतला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाक व्याप्त काश्मीर आणि सियाचीन हा भारतातच भाग असल्याचे काँग्रेसला, स्पष्ट केले आहे.’ बालासोर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सारंगी यांनी वंदेमारतम विषयीही परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘ज्यांना वंदेमातरम स्वीकारायचे नाही, त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही.’ सारंगी म्हणाले, ’७२ वर्षांनंतर केवळ मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने काश्मीरच्या जनतेला सर्वाधिकार दिले आहेत. काश्मीरमध्ये जमीन खरेदीचे व्यवहार सुरू झाले आहेत. आता काश्मीरच्या मुलींना काश्मीरबाहेरील मुलांशी विवाह करता येणार आहे. देशातील काही लोक सरकारने कलम ३७० संदर्भात घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचं सिद्ध करण्याचा आटापिटा करत आहेत. जेव्हा कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाला संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळत असताना, ‘तुकडे-तुकडे गँग’ला सर्वांत मोठा धक्का बसला आहे. त्यांच्याकडून काश्मीरमधील मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. पण, गेल्या अनेक वर्षांत काश्मीरमध्ये हजारो जवानांचा मृत्यू झाला. त्यावेळी मानवाधिकार दिसला नाही का?’

सर्वेक्षणाचा कौल भाजपच्याच बाजूने

मंदींसाठी कोणाला धरले जबाबदार?
देशात नोटा बंदी आणि जीएसटीमुळे मंदी आल्याचे विधान मंत्री सारंगी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मोदी सरकारचे हे दोन्ही निर्णय महत्त्वाकांक्षी होते. पण, त्यावर केंद्रातीलच एखाद्या मंत्र्याने विरोधी वक्तव्य करणे आश्चर्यकारक होते. पण, सारंगी यांनी हे विधान करतानाच कोणाच्याही नोकऱ्या जाणार नाहीत आणि लवकरच अर्थव्यवस्थेचे चित्र बदलेल, असा विश्वास व्यक्त केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central minister sarangi statement about vande mataram bhubaneswar