चमोली दुर्घटना अपडेट : आतापर्यंत 32 मृत, 206 बेपत्ता; रेस्क्यू ऑपरेशन सुरुच

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 February 2021

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील ऋषीगंगामध्ये रविवारी ग्लेशियरच्या कोसळण्याने मोठ्या प्रमाणावर नासधुस झाली आहे.

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील ऋषीगंगामध्ये रविवारी ग्लेशियरच्या कोसळण्याने मोठ्या प्रमाणावर नासधुस झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 206 लोक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या 25 ते 35 कामगारांना वाचवण्याचं बचावकार्य सध्या सुरु आहे. मंगळवारी रैणी गावामधील ऋषीगंगा प्रकल्पाच्या साईटवरुन चार आणखी मृतदेह प्राप्त झाले आहेत. याप्रमाणे एकूण मृत लोकांची संख्या 32 वर  पोहोचली आहे. 

रैणी-तपोवन दुर्घटनाग्रस्त भागात जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात तीन दिवसांपासून अडकलेलल्या लोकांना वाचवणे कठीण होत आहे. बोगद्याच्या आत असणारा टनावारी कचरा बचाव कार्यात अडथळा ठरत आहे. सेना, आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ घटनास्थळी बचाव कार्यात मग्न आहे. मात्र, बोगद्याच्या आत अवस्था अशी आहे की, अडकलेल्या लोकांना वाचवणे मोठे आव्हान बनलेले आहे. 

हेही वाचा - मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत दुमदुमली लोकसभा; आज PM मोदी-राहुल गांधी आमनेसामने
तपोवन प्रकल्पामध्ये दोन बोगदे आहेत. दोन किमी लांब मोठा असणारा बोगदा पूर्णपणे बंद आहे. त्याचे तोंड देखील कचऱ्यामुळे पूर्णपणे बंद झाले आहे. मुख्य बोगद्यापासून 180 मीटर लांब दुसरा बोगदा जोडला जातो. याच बोगद्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

या दुसऱ्या बोगद्यासोबतच आणखी एक 450 मीटर लांब सहाय्यक बोगदा देखील आहे. जिथे जवळपास 30 कामगार अडकले असल्याची शक्यता आहे. तर पाच कामगार दोन किमी लांब मुख्य बोगद्यात अडकले आहेत. मात्र मंगळवारी संध्याकाळपर्यंत 150 मीटरपर्यंतच जवानांना जाता आलं  आहे. यात जेसीबी 120 मीटरपर्यंत पोहोचू शकला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chamoli disaster 32 dead bodies recovered so far 206 people still missing