मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत दुमदुमली लोकसभा; आज PM मोदी-राहुल गांधी आमनेसामने

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 February 2021

आज सरतेशेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चांमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतील.

नवी दिल्ली : काल मंगळवारी काँग्रेस, समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, नॅशनल कॉन्फरंससहित विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लोकशाही मुल्यांना पायदळी तुडवणे तसेच गंगा-जमुनी संस्कृतीला तोडण्याचा आरोप विरोधकांनी लावला. काल लोकसभेची कार्यवाही रात्री 1 वाजेपर्यंत चालली. यात सत्ताधारी आणि विरोधक खासदारांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावरील चर्चेत सहभाग घेतला. 

आज सरतेशेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चांमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देतील. सोमवारी मोदींनी राज्यसभेतील उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. आज एकीकडे पंतप्रधान मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावाला उत्तर देतील तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देखील बजेटवर आपल्या पक्षाकडून पहिले वक्ता म्हणून आपले आणि आपल्या पक्षाचे मत मांडतील. त्यामुळे आज मोदी आणि राहुल गांधी आमनेसामने येण्याची शक्यता आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 9 वा दिवस आहे. 

हेही वाचा - ट्रम्प यांच्याविरोधातील दुसऱ्या महाभियोगास सुरवात; आजपासून होतेय सुनावणी

आभाराच्या प्रस्तावाचा दुसरा दिवस
आभाराच्या प्रस्तावावर दुसऱ्या दिवशीच्या चर्चेदरम्यान विरोधकांनी म्हटलं की, केंद्राने शेतकऱ्यांची मागणी मान्य करुन या समस्येवर तोडगा काढायला  हवा. तर भाजपने म्हटलं की, मोदी सरकार 'वसुधैव कुटुंबकम' आणि 'सबका साथ, सबका विकास' या भावनेनेच काम करत आहे. एकीकडे आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून देशाला मजबूत बनवण्याचे काम सुरु आहे तर दुसरीकडे विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून नव्या भारताची वाटचाल सुरु असल्याचं म्हटलं आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरवात 29 जानेवारी रोजी झाली होती. यावेळी राष्ट्रपतींनी अभिभाषण केलं होतं. 1 फेब्रुवारी रोजी 2021 सालासाठीचा अर्थसंकल्प सादर केला होता. गेल्या 9 दिवसांत शेतकरी आंदोलनावरुन दोन्ही सभागृहात मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. विरोधकांनी मोदी सरकारवर करडे ताशेरे ओढत कार्यपद्धतीवर टीका केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीला संपणार आहे तर या अधिवेशनाचा दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Modi Rahul Gandhi likely to speak in Lok Sabha today motion of thanks