Tripura politics : त्रिपुरात डावे-काँग्रेस युतीची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chances of Left-Congress alliance in Tripura joint appeal against ruling BJP politics

Tripura politics : त्रिपुरात डावे-काँग्रेस युतीची शक्यता

आगरताळा : ईशान्येतील त्रिपुरात आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस आणि डावे पक्ष युती करण्याची शक्यता आहे. नववर्षात फेब्रुवारीत ही निवडणूक होणार आहे. बंगालमध्ये २०२१ मधील निवडणूकीच्यावेळी हे दोन पक्ष एकत्र आले होते. त्याच धर्तीवर युती होऊ शकते.

सत्ताधारी भाजपचा सामना करण्याचा यामागील उद्देश असेल. भाजपच्या गैरकारभाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी त्रिपुरातील जनतेने राजकीय ओळख, धर्म, जात, समुदाय असे सारे बाजूला ठेवून पुढे यावे असे संयुक्त आवाहन नुकतेच करण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह (सीपीएम) पाच डावे पक्ष आणि काँग्रेसने ही साद दिली आहे.

काँग्रेसचे केंद्रातील प्रमुख नेते तसेच त्रिपुराचे प्रभारी अजॉय कुमार यांनी भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव न घेता टीका केली. त्यांनी सांगितले की, आम्ही फॅसिस्टवादी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी त्रिपुरात आलो आहोत. त्रिपुराच्या जनतेने आपल्या हक्कांसाठी लढा द्यावा. भाजपला जनता कंटाळली आहे. लोक समान व्यासपीठावर येण्यास उत्सुक आहेत.

भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआयएम) राज्य सचिव आणि लोकसभेचे माजी खासदार जितेंद्र चौधरी यांनी भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. त्यांच्या पक्षाचे आणि काँग्रेसचे नेते अलीकडे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले आहेत.

भाजपकडून प्रत्युत्तर

सत्ताधारी भाजपने संभाव्य युतीबाबत प्रत्यूत्तर दिले. मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले की, विरोधी पक्षांमधील युती म्हणजे यापूर्वीच नाकारण्यात आलेली कल्पना आहे. पश्चिम बंगालप्रमाणेच त्रिपुराची जनता सुद्धा त्यांना नाकारेल. काँग्रेस आणि भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट या दोन्ही पक्षांची कामगिरी खराब झाली आहे. येत्या निवडणुकीतही त्यांची हीच गत होईल.

ती मंडळी (भाजप, रा. स्व. संघ) मंडळी काँग्रेसचा वारसा नष्ट करीत आहेत. काही जण नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपिता म्हणतात, तर इतरांकडून मोहन भागवत यांचा तसा उल्लेख केला जातो. भाजपकडे असे अनेक पिता आहेत, पण आपल्याकडे एकच राष्ट्रपिता आहेत आणि ते म्हणजे महात्मा गांधी. उद्या कुणीतरी अमित शहा यांना आणखी एक राष्ट्रपिता बनवतील...

- अजॉय कुमार, काँग्रेसचे नेते

त्रिपुरामध्ये कायद्याचे राज्य नाही. भाजप सत्तेवर असताना गेल्या ५८ महिन्यांच्या कालावधीत राज्यघटनेची पायमल्ली झाली. आगामी निवडणूक मुक्त आणि न्याय्य व्हावी म्हणून योग्य वातावरण निर्माण करावे असे आवाहन आम्ही निवडणूक आयोगाला केले आहे.

- जितेंद्र चौधरी, कम्युनिस्ट नेते

टॅग्स :CongressTripuraDesh news