चंद्राबाबू नायडू यांचे नरेंद्र मोदी यांना पत्र; केला गंभीर आरोप

वृत्तसंस्था
Monday, 17 August 2020

राज्यात जंगल राज असून मानवी अधिकाराचे हनन होत असल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

हैदराबाद- मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सरकारकडून विरोधकांचे फोन टॅप केले जात आहेत, असा आरोप आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहले असून उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. टेलिफोन टॅपिंगमुळे नागरिकांचा खासगीपणा धोक्यात आल्याचेही नायडू यांनी म्हटले आहे. 

Breaking : JEE आणि NEET परीक्षा होणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय,...
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पत्र लिहले आहे. त्यात म्हटले की, वायएसआर कॉंग्रेस सरकारकडून विरोधी पक्ष, वकिल, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी फोन टॅपिंग केले जात आहेत. राज्यात जंगल राज असून मानवी अधिकाराचे हनन होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. टेलिफोन टॅपिंग प्रकरणाची वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केली.

आंध्रातील सत्तारुढ पक्ष हा विरोधी पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांचे फोन टॅप करण्यासाठी सरकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करत आहे. राज्यातील गुप्तचर यंत्रणेकडून आपल्या दोन नंबरवर पाळत ठेवली जात असल्याचे नायडू यांनी म्हटले आहे. भारतीय घटनेने कलम १९ आणि २१ नुसार प्रदान झालेल्या मुलभूत हक्कांवर सरकारकडून गदा आणली जात आहे. सत्तारुढ पक्षांकडून विरोधकांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि धमकावण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे.लोकांच्या खासगीपणात हस्तक्षेप केला जात असून ही बाब गंभीर असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मोठी बातमी : काँग्रेसमध्ये जवळपास १०० मोठे नेते नाराज; हवाय नेतृत्व बदल

यादरम्यान, राज्यातील ज्येष्ठ वकिल श्रवण कुमार यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कथित टेलिफोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. आपण न्यायलयासमोर काही पुरावे आणले असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. उद्या (ता. १८) याचिकेवर सुनावणी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrababu Naidu's letter to Narendra Modi Made serious allegations