दिल्लीतील दंगल सुनियोजित;लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याची पोलिसांची माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 15 September 2020

उत्तर-पूर्व दिल्लीत मागील फेब्रुवारीत झालेल्या दंगलीचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे.

नवी दिल्ली- उत्तर-पूर्व दिल्लीत मागील फेब्रुवारीत झालेल्या दंगलीचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. सध्या पोलिस या प्रकरणी आरोपींच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची तयारी करत आहेत. 17 सप्टेंबरला हे आरोपपत्र दाखल होईल, अशी माहीती दिल्ली पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी दिली आहे. याआधी रविवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दंगलीप्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खलिद याला अटक केली होती. 

'समलिंगी विवाह आपल्या संस्कृतीचा भाग नाही', केंद्राने न्यायालयात...

दिल्ली पोलिस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव यांनी सोमवारी म्हटलं की, दंगलीच्या कटाचा तपास पूर्ण होत आला आहे. या प्रकरणी येत्या गुरुवारपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाईल. पोलिस उपायुक्त प्रमोद सिंह कुशवाह यांनी म्हटलं की, दंगलीचा कट सुनियोजित पद्धतीने झाला होता, कारण तपासादरम्यान पोलिसांना सीएए म्हणजेच सुधारित नागरीकत्व कायद्याच्या विरोधकांचा 'रस्ते जाम करा.' असा एकसारखा पॅटर्न दिसून आला. कुशवाह यांनी पुढे म्हटलं की, ही बाब दाखवून देते की हा सुनियोजित कट होता, ज्यामुळे हे सगळं सुरु झालं. या दोन्हाही अधिकाऱ्यांनी वेबिनारद्वारे ही माहीती दिली. 

जगातील 8 असे देश ज्यांच्या सीमा आहेत अभेद्य!

श्रीवास्तव यांनी असेही म्हटलं की, ज्या लोकांची सध्या चौकशी सुरु आहे ते सगळे सोशल मिडीयावर चांगल्या पद्धतीने सक्रीय आहेत. त्यांनी म्हटलं की, आम्ही सध्या तपासाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत आणि उमर खलिदला देखील अटक केली आहे. यामुळेच खासकरुन सोशल मिडीयावर आणि टिव्ही चॅनेलवर जोरदार विरोध दर्शवला जात आहे. तपासाबद्दल साशंकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. 

पोलिस आयुक्तांनी म्हटलं की या प्रकरणी 751 गुन्ह्यांची नोंद झाली होती आणि या साऱ्या गुन्ह्यांचा  निष्पक्ष पद्धतीने तपास झाला आहे. दिल्ली दंगलीत 53 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chargesheet will lodge 17 september in case of delhi riots