Chhatrapati Shivaji Maharaj: दुबई मध्ये साजरा झाला " शिव जयंती " उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhatrapati Shivaji Maharaj celebration

Chhatrapati Shivaji Maharaj: दुबई मध्ये साजरा झाला " शिव जयंती " उत्सव

दुबई - महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या जयंती निमित्ताने काल दुबईमध्ये MPFS तर्फे भव्य दिव्य असा " शिव जयंती " उत्सव तमाम शिवप्रेमी आणि बाल गोपाळांच्या उपस्थितीत जाज्वल्य अभिमानाने साजरा करण्यात आला. 

महाराजांना जयंती निमित्ताने मान वंदना देताना मुलांनी महाराष्ट्राचा रांगडा, कणखर बाणा जपत, संस्कृती आणि परंपरेचा सुरेख मिलाफ घालत आपल्या कलागुणांद्वारे शिवकालीन इतिहासातील एक एक पान जिवंत केले. 

सभासदांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उत्साही प्रतिसादात सकाळी १० वाजता "संयुक्त अरब अमिराती" आणि "भारताचे" राष्ट्रगीत सभागृहात वाजवण्यात आले.

मंडळाचे खजिनदार सुमेय ह्यांनि आपल्या मधुर  बासरी वादनाने कार्यक्रमाची वातावरण निर्मित केली.

MPFS चे अध्यक्ष श्री. देवेंद्र लवाटे ह्यांनी कार्यक्रमाची सूत्रे हातात घेऊन शिवजयंती चे महत्व सांगत परदेशात असा कार्यक्रम आयोजित करण्या मागचे प्रयोजन सांगितले आणि कलाकारांचे  मनोबल उंचावत त्यांना मंचावर आमंत्रित करण्यास सुरवात केली.

जास्तीतजास्त ४ मिनिटाचे सादरीकरण ह्या प्रमाणे जवळपास २५ ते ३० कलाकारांनी आपली कला ह्या निमित्ताने सादर केली.

कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य सांगायचे तर मुलांचे नेत्रदीपक असे कलाविष्कार, विलक्षण पाठांतर, मराठी भाषेवरील उत्तम असे प्रभुत्व, प्रचंड चिकाटी आणि प्रखर जिद्दीने आपले सादरीकरण पूर्णत्वास नेण्याची इर्ष्या. संपूर्ण कार्यक्रमात एकही सादरीकरण अपूर्ण राहिले नाही.

आणि एकही कलाकार कुठेही अडखळला नाही हे खास नमूद करण्यासारखे. वातावरणातला जोश कायम ठेवत परदेशात राहत असताना मुलांना दिवसाचे महत्व विशद करताना देवेंद्र यांनी छोट्या छोट्या प्रश्नांद्वारे महाराजांच्या कारकिर्दीचा परामर्श घेतला. 

परदेशात राहत असताना जिथे मराठी हा विषय अभ्यासक्रमात नसताना, संपूर्ण कार्यक्रम मराठी भाषेत करून मुलांनी महाराष्ट्राची अस्मिता मनापासून जपली.

सर्वात महत्वाचे म्हणजे पालकांनी आपल्या पाल्यावर घेतलेली मेहनत हि त्यांच्या सादरीकरणातून प्रकर्षाने जाणवत होती.

अगदी मुलांचा पारंपरिक पोशाख, मुलींचा साजशृंगार सर्व गोष्टींचा पालकांनी खूप बारकाईने विचार केला होता ज्यामुळे प्रत्येक गोष्ट ठळकपणे नजरेत भरत होती.खास नमूद करण्यासारखे म्हणजे मुलांचे सुस्पष्ट उच्चार आणि आपण जे सादरीकरण करत आहोत त्या बद्दलची समज, जिज्ञासा त्यांच्या प्रत्येक सादरीकरणातून जाणवत होती. 

कार्यक्रमाच्या सादरीकरणातील विविधता ज्यामुळे कार्यक्रमाची उंची गगनाला जाऊन भिडली. शिवशाहिरांचा पोवाडा, जिजाऊंचे स्वगत, ऐतिहासिक गोष्टींचे ओघवते कथन,

पाळणा, नवीन चित्रपटातील जोशपूर्ण अशी पारंपरिक गाणी त्यावर सादर केलेली बहारदार नृत्य, पारंपारिक कविता अगदी प्रत्येक सादरीकरणातून महाराष्ट्राला लाभलेली कलेची विशाल परंपरा डोकावत होती. 

कालच्या कार्यक्रमामुळे प्रकर्षाने जाणीव झाली ती आमच्या मुलांना मराठी येत नाही अशी सबब देणाऱ्या पालकांची. कदाचित हेच कालच्या कार्यक्रमाचे फलित होते कारण कालच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 

सर्व स्थानिक कलाकारांना परदेशात राहून आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी मिळालेली संधी आणि त्याचे त्यांनी केलेले चीज आणि पालकांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमात आपल्या मुलांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करून

त्यांचा वाढवलेला उत्साह आणि त्यासाठी आपल्या मुलांना आपल्या मातृभाषेची, संस्कृतीची,परंपरेची करून दिलेली ओळख जी मुलांना आयुष्यभर लक्षात राहणार आहे. 

कार्यक्रम सादर करण्यामागचा मूळ हेतू, उत्कृष्टपणे आखलेली कार्यक्रमाची रूपरेषा, अत्यंत सोप्या पद्धतीने केलेली कार्यक्रमाची मांडणी आणि परदेशात राहत

असताना आपल्या संस्कृती, परंपरेचे केलेलं जतन ह्या सगळ्यामुळे एका सुरेख, वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य सर्व छत्रपतींच्या भक्तांना कालच्या कार्यक्रमामुळे लाभले ह्यात शंकाच नाही.