
एका मुलीची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसंच तस्करीनंतर तिच्यासोबत झालेलं कृत्य हे त्याहून संतापजनक असं आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशात छत्तीसगढच्या एका मुलीची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसंच तस्करीनंतर तिच्यासोबत झालेलं कृत्य हे त्याहून संतापजनक असं आहे. पीडीत मुलीचं छत्तीसगढमधून अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणानंतर तिला विकण्यात आलं. पीडित मुलीचं वय 18 वर्षे असून तिला 2020 मध्ये सात वेळा वेगवेगळ्या राज्यांमध्ये विकण्यात आलं. शेवटी जबरदस्तीला त्रासलेल्या पीडितेनं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी मानवी तस्करी रॅकेट चालवणाऱ्या दाम्पत्यासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
एका दाम्पत्याने मध्य प्रदेशात जुलै 2020 मध्ये पीडित मुलीला नोकरी देण्याच्या आमिषाने छत्तीसगढच्या जशपूरमधून छतरपूर इथं आणलं होतं. तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून अखेर तिने आत्महत्या केली. दरम्यानच्या काळात अनेकदा तिला विकण्यात आलं. पहिल्यांदा छतरपूर इथं राहणाऱ्या एका दाम्पत्याने तिचं अपहरण केलं. त्यानंतर वडिलांकडे खंडणी मागितली गेली. जेव्हा पैसे मिळाले नाहीत तेव्हा मुलीला 20 हजार रुपयांना विकलं. शेवटी 70 हजार रुपयांमध्ये तिला विकलं आणि लग्नही लावून दिलं गेलं. शेवटी तिने आत्महत्या करून जीवन संपवलं.
छतरपूरचे पोलिस अदीक्षक सचिन शर्मा यांनी सांगितलं की, अपहरण करण्यात आलेल्या मुलीला ट्रॅक करण्यासाठी छत्तीसगढ पोलिसांच्या मदतीने पथक तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर सिरियल मानवी तस्करीचं रॅकेट समोर आलं. पोलिसांच्या पथकाने आरोपी संतोश कुशवाहच्या घरावर नजर ठेवली होती. यावेळी ललितपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी केली असता त्यामध्ये मुन्नाने पीडितेला विकल्याचं समजलं. त्यानंतर पीडितेला 70 हजार रुपयांमध्ये संतोष कुशवाहने खरेदी केलं. कुशवाहने त्याच्या मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या मुलासोबत तिचं लग्न लावून दिलं. यानंतरच पीडित मुलीने 10 सप्टेंबर 2020 ला आत्महत्या केली.
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्हा पोलिसांनी एका तरुण दाम्पत्याकडून चालवल्या जाणाऱ्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पीडित मुलीला विकून हे दाम्पत्य थांबलं नाही तर तिच्या आई वडिलांकडून पैशांची मागणीही केली. पीडितेला नोकरीचं आमिष दाखवून गावातून नेण्यात आलं होतं. त्यानंतर कल्लू रायकवार या व्यक्तीने तिला 20 हजार रुपयांमध्ये विकत घेतलं होतं.
हे वाचा - पाकिस्तानी-खलिस्तानी अकाउंट बंद करा; सरकारचा ट्विटरला पुन्हा आदेश
सातवेळा विक्री, छळ अखेर आत्महत्या करून संपवलं जीवन
3 जुलैला पीडितेचं छत्तीसगढमधून अपहरण झालं होतं. त्यावेळी तिच्या आई वडिलांकडून पैसे मिळाले नाही म्हणून 20 हजार रुपयांत कल्लूला विक्री करण्यात आली. कल्लूने मुलीला हरेंद्र सिंह बुंदेलाला विकलं. पुढे बुंदेलाकडून पुन्हा राजपाल सिंह परमारने घेतलं. परमारकडून पीडितेला रनगावं इथं देशराज कुशवाहला विकण्यत आलं. त्यानंतर देशराजने तिला मुन्ना कुशवाहला विकलं. शेवटी ललितपूरच्या संतोश कुशवाहने पीडितेला 70 हजार रुपयांना खरेदी केलं. ललितपूरमध्ये मानसिक, शारिरीक छळ झाल्यानं तिने 10 सप्टेंबर 2020 ला गळफास घेत आत्महत्या केली.