चिदंबरम हे कॉंग्रेसचे शरीफ 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 14 मे 2018

विदेशातील अमाप संपत्तीची माहिती दडविल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर स्वतःच जामिनावर बाहेर असलेले कॉंग्रेस अध्यक्ष कारवाई करतील का, असा तिखट हल्ला भाजपने चढविला आहे. सत्तारूढ भाजपने "चिदंबरम हे कॉंग्रेसचे (नवाज) शरीफ आहेत', असे टीकास्त्र सोडले आहे. 
 

नवी दिल्ली - विदेशातील अमाप संपत्तीची माहिती दडविल्याप्रकरणी ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर स्वतःच जामिनावर बाहेर असलेले कॉंग्रेस अध्यक्ष कारवाई करतील का, असा तिखट हल्ला भाजपने चढविला आहे. सत्तारूढ भाजपने "चिदंबरम हे कॉंग्रेसचे (नवाज) शरीफ आहेत', असे टीकास्त्र सोडले आहे. 

दरम्यान, कर्नाटक निवडणुकांचा निकाल भाजपला प्रतिकूल ठरला, तर कॉंग्रेसच्या मायलेकांविरुद्ध नॅशनल हेरल्ड गैरव्यवहाराच्या कारवाईला विलक्षण गती येण्याची शक्‍यता वर्तविली जाते. भाजपने चिदंबरम यांची तुलना अप्रत्यक्षपणे नवाज शरीफ यांच्याबरोबर केली. 

भाजप नेत्या व संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ""संपत्तीची माहिती अशीच दडविणारे माजी पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याप्रमाणेच चिदंबरम यांनाही कॉंग्रेस सक्तीची निवृत्ती देणार काय,'' असा सवाल विचारला. त्या म्हणाल्या, ""स्वतःच जामिनावर तुरुंगाबाहेर असलेले गांधी हे चिदंबरम यांच्याविरुद्ध काही कृती, किमान उक्ती तरी करतात का, याची प्रतीक्षा आहे.'' 

सीतारामन म्हणाल्या, ""माजी अर्थमंत्र्यांवर विदेशातील संपत्तीची पूर्ण माहिती न दिल्याचा किंवा ती दडविल्याचा आरोप आहे. प्राप्तिकर विभागाने चिदंबरम यांच्या कुटुंबीयांवर चार आरोपपत्रे दाखल केली आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष चिदंबरम यांच्यावर शरीफ यांच्याप्रमाणे कारवाई करू शकतात का, कारण शरीफ व चिदंबरम यांच्यावर विदेशांतील संपत्तीची माहिती दडविल्याबाबतचे आरोप एकसारखेच दिसत आहेत. अर्थात, मोदी सरकारने आणलेल्या 2015 च्या काळा पैसाविरोधी कायद्यानंतर जनतेला सारे सत्य माहिती होऊ लागले आहे.'' 

दरम्यान, सीतारामन यांचा तोफखाना धडाडल्यावर काही मिनिटांतच चिदंबरम यांनी एका एसएमएसद्वारे, ""हे प्रकरण उच्च न्यायालयात असून तेथेच त्याचा फैसला होईल,'' असे प्रत्युत्तर दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chidambaram is the Congress's nawaz Sharif