चीनचा आडमुठेपणा कायम; सैन्य माघारी घेण्यास करतोय टाळाटाळ

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 17 August 2020

लडाख सीमेवर सैन्य माघारीत चीनने चालविलेली टाळाटाळ पाहता पुढील उपाययोजनांबाबत चर्चेसाठी राजकीय नेतृत्व आणि लष्करी नेतृत्वाची लवकरच लडाखमध्ये बैठक होणार असल्याचे समजते.

नवी दिल्ली- लडाख सीमेवर सैन्य माघारीत चीनने चालविलेली टाळाटाळ पाहता पुढील उपाययोजनांबाबत चर्चेसाठी राजकीय नेतृत्व आणि लष्करी नेतृत्वाची लवकरच लडाखमध्ये बैठक होणार असल्याचे समजते. गलवान खोऱ्यामध्ये पॅंगॉग त्सो तलावाचे फिंगर क्षेत्र, देप्सांग पठार तसेच गोगरा या भागामधून चीनने सैन्य माघारी बोलवावे याबाबत लष्करी आणि राजनैतिक पातळीवर वारंवार चर्चा होऊनही चीनी सैन्याची आडमुठी भूमिका राहिली आहे.

ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन

सैन्य माघारीबाबत भारत आणि चीन दरम्यान मेजर जनरल पातळीवर नुकतीच चर्चा झाली होती. दौलत बेग ओल्डी भागात झालेल्या या चर्चेदरम्यान भारताने गस्तीबिंदू १०, ११, १२ आणि १३ पर्यंत भारतीय गस्तीपथकांची हद्द असल्याचे ठामपणे सांगितले होते. दौलत बेग ओल्डी आणि पूर्व लडाख भागातून भारतानेच माघार घ्यावी, असा कांगावा चीनने चालवला आहे. एवढेच नव्हे तर सीमाभागात भारताने रस्त्यांचे केलेले बांधकाम, पायाभूत सुविधा उभारणे यावर चीनला आक्षेप आहे. मात्र, हे सर्व भारतीय हद्दीत असल्याने त्यावर चीनने आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही, असे भारताचे म्हणणे आहे. 

चीनने दौलत बेग ओल्डी भागात मोठ्या प्रमाणात सैन्य जमावजमव केली असून लांब पल्ल्यांच्या तोफा, चिलखती वाहने आणली आहेत. तर कोणत्याही दुःसाहसाला तोंड देण्यासाठी भारतानेही पुरेशी तयारी केली आहे. फिंगर क्षेत्रात चीनी सैन्य तीन महिन्यांपासून ठाण मांडून बसले असून युद्ध तयारीसाठीचे खंदक आणि चौक्याही उभारल्या आहेत. यापार्श्वभूमीवर भारतीय हद्दीतील देप्सांग, गोगरा भागामध्ये तसेच फिंगर भागातील या घुसखोरीबाबत पुढील रणनीती ठरविण्यासाठी लष्करी आणि राजकीय नेतृत्वाची बैठक लवकरच होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भारताने आता चीनशी पूर्ववत संबंध होण्यासाठी, उभयमान्य सहमतीने सैन्य माघारीतून सीमेवर शांतता प्रस्थापित होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.

कोरोनापेक्षा धोकादायक विषाणू; मलेशियात भारतीय नागरिकामुळे संक्रमण

सहकार्य करण्यास तयार

परस्पर राजकीय विश्‍वासार्हता निर्माण व्हावी आणि द्विपक्षीय संबंध सुधारावेत, यासाठी भारताबरोबर सहकार्य करण्यास तयार असल्याचे चीनने आज सांगितले. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शत्रूला जोरदार प्रत्युत्तर दिले जात असल्याचे म्हटले होते. आजच्या दैनंदिन पत्रकार परिषदेवेळी याबाबत विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिअन म्हणाले की, भारत-चीन जवळचे मित्र असून दोन्हीही वेगाने विकसीत होणारे देश आहेत. त्यामुळे द्वीपक्षीय संबंधात सुधारणा झाल्यास दोन्ही देशांचा फायदा तर आहेच, शिवाय या प्रदेशात स्थैर्य, शांतता, समृद्धीही वाढेल. दोन्ही देशांनी एकमेकांचा आदर राखायला हवा. राजकीय विश्‍वासार्हता निर्माण व्हावी, यासाठी भारताबरोबर सहकार्य करण्याची चीनची भूमिका आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China military withdrawal persists india china face off