चिनीमातीच्या बरण्या ‘मेड इन चायना’ नाही हं!... तर बनतात भारतातल्या ‘या’ गावात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

चिनामातीच्या बरणीसाठी चिनी हे नाव जरी जोडण्यात आलं असेल ना..तरीही त्या भारतातच बनतात...मेड इन चायना म्हटल्यावर युज आणि थ्रो वस्तुंना आपण ओळखतो

आधीच जगभराला करोना सारख्या आजाराला कारणीभूत ठरलेला चीन भारताशी युद्ध सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे चीनच्या सीमेवर तणाव सुरू आहे. सध्या भारतात सर्वत्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली आहे. अशातच आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या चिनीमातीच्या बरण्या तर चीनच्या नाही ना? किंवा त्याचाही बहिष्कार म्हणून त्या फेकून तर द्यायच्या नाही ना असा प्रश्न तुम्हाला पडत असेल...पण तुम्हाला माहित आहेत का...चिनामातीच्या बरणीसाठी चिनी हे नाव जरी जोडण्यात आलं असेल ना..तरीही त्या भारतातच बनतात...मेड इन चायना म्हटल्यावर युज आणि थ्रो वस्तुंना आपण ओळखतो पण चीनच्या नावाची भारतातील या गावातील चिनी मातीची भांडी वर्षानुवर्षे लोणचे तिखट टिकवतात. आजही आपल्या पैकी अनेकांच्या घरी पिढ्यानपिढ्या टिकलेल्या बरण्या आहेत. पण याचं श्रेय जातं 'या' गावाला..

पण ही चिनीमाती कुठून आली?
चीनमधील जौचु फा जवळील काउलिंग नावाच्या टेकडीत केओलिनाइट हे औद्योगिक खनिज आढळत असल्यामुळे या मातीला काउलिंग हे नाव पडले. हे खनिज चीनमध्ये मोठ्या प्रमाणात सापडते म्हणून त्याला चीनीमाती असे म्हणतात. केओलीन हे त्याचे अपभ्रष्ट रूप आहे. केओलिनाइट पांढऱ्या रंगाचे असते. केओलिनाइटचा मुख्य उपयोग चिनी मातीची भांडी आणि इतर वस्तू करण्यासाठी होतो. भारतामध्ये उच्च प्रतीच्या चिनी मातीचे साठे बिहार, कर्नाटक, केरळ, तसेच दिल्ली व जबलपूर जवळचे भाग यांच्यामध्ये आहेत. पश्चिम बंगाल, ओरिसा, गुजरात, राजस्थान व तमिळनाडू या राज्यांतही चांगले केओलीन मिळत असले तरी देखील चिनीमातीची भांडी मात्र उत्तरप्रदेशातील 'खुर्जा' या गावी तयार होतात. 

तैमुर आणि चिनीमातीचा संबंध काय? हा आहे इतिहास
मंगोल साम्राज्याचा राजा तैमुरलंग चौदाव्या शतकात भारतात आला. अत्यंत क्रूर अशी त्याची ओळख होती. अख्ख्या जगावर राज्य करायचे त्याचे स्वप्न होते.  इराण, अझरबैजान, अफगाणिस्तान, कुर्दीस्तान हे देश जिंकले. त्याचे पुढचे लक्ष भारत देश होते. अफगाणिस्तानमधून पेशावर मार्गे भारतात उतरला. वाटेतील सगळी गावे बेचिराख करत त्याने दिल्लीकडे कूच केली. तेव्हाच दिल्लीचा सुलतान मेहमूद तुघलक याने मोठे सैन्य पाठवून तैमुरवर आक्रमण केले. पानिपतच्या युद्धात दिल्लीच्या सुलतानचा तैमुरने मोठा पराभव केला. मेहमूद तुघलक युद्धभूमी सोडून पळून गेला. त्याच्या पळून जाण्यामुळे दिल्ली तैमुरच्या ताब्यात आली. कित्येक दिवस त्याने दिल्ली लुटली. लाखो जणांना मारून टाकले. पण हा तैमुर खूप दिवस दिल्लीत थांबला नाही. जाता जाता त्याने मेरठ सारखी शहरे लुटली. इथले कारागीर तो आपल्या देशाला घेऊन गेला. 

तैमुरचे सैनिक मात्र खुर्जा मध्येच थांबले
तैमुर परत गेला पण त्याच्या सोबत आलेले काही सैनिक मात्र खुर्जा मध्येच थांबले.

 तैमुरचे सैनिक मूळचे कुंभार होते.
 चिनी मातीची भांडी बनवण्याची मंगोल कला त्यांनी खुर्जा मध्ये रुजवली. दिल्ली पासून जवळ असलेलं हे गाव चिनी मातीच्या भांड्यासाठी प्रसिध्द झाले. आपण लोणचे, तिखट अशा बऱ्याच दिवस टिकावे यासाठी लागणाऱ्या खास बरण्या इथूनच भारत भरात विकायला पाठवल्या जातात. 

 खुर्जा मध्ये चिनीमातीच्या वस्तूंची क्वालिटी उत्तम
खुर्जा मध्ये विजेचे फ्यूज़ सर्किट, इन्सुलेटर, प्रयोगशाळेतील उपकरण, विमानात लागणारे स्पेअरपार्ट, टरबाइन, रॉकेट, न्यूक्लियर फ्यूज़न, अंतराळयानासाठी लागणारे चिनीमातीचे उपकरण तयार होतात.

खुर्जाच्या तुलनेत चीन मधील वस्तू महाग आहेत.
खुर्जा मध्ये चिनीमातीच्या वस्तूंची क्वालिटी उत्तम आहे. विजेच्या खांबावर लागणारे चीनचे इंस्युलेटर जरा गरम झाले की खराब होतात पण खुर्जातले इन्सुलेटर त्यामानाने जास्त काळ टिकतात. आज भारतातल्या चीनला मागे टाकून खुर्जा चिनीमातीच्या भांड्याची राजधानी बनली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese Earthenware is not made in China but in the village of Khurja in India