व्हायरल व्हिडिओबाबत चिराग पासवान यांचे ट्विटरवरून प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

चिराग पासवान हे दिवंगत वडील रामविलास पासवान  (Ramvilas Paswan) यांच्या फोटोसमोर शूट करताना हसत असल्याचंही दिसत होतं. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. 

पटना - बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election 2020) आधी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये चिराग पासवान हे दिवंगत वडील रामविलास पासवान  (Ramvilas Paswan) यांच्या फोटोसमोर शूट करताना हसत असल्याचंही दिसत होतं. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता विरोधकांच्या या टीकेला चिराग पासवान यांनी आणखी एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुख्यमंत्री नितिश कुमार (Nitish Kumar) यांनी केलेल्या टीकेनंतर चिराग पासवान यांनी पलटवार केला आहे. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चिराग पासवान यांनी दुसरा एक व्हिडिओ शेअर करून म्हटलं की, नितिश कुमार यांनी जनता कधीच माफ करणार नाही. वडिलांच्या निधनानंतर सहा तासातच मला पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी द्यायची होती. मला पक्षाची सर्व कामे पूर्ण करायची आहेत. यातच 10 दिवस मला घराबाहेर पडता येत नव्हतं. या परिस्थितीत डिजिटल प्रचारासाठी व्हिडिओ शूट करणं भाग होतं.

वडिलांच्या जाण्याचं दु:ख मला किती आहे याचं प्रमाणपत्र मला नितिश कुमार यांच्याकडून घ्यावं लागणार का असा प्रश्न चिराग पासवान यांनी विचारला आहे. मी दररोज शूटिंग करत आहे. माझ्याकडे काही पर्याय आहे का? प्रचार शिगेला पोहचला असताना आणि निवडणूक अंतिम टप्प्यात असतानाच वडिलांचे निधन झाले. पण मुख्यमंत्री इतक्या खालच्या पातळीवर पोहचतील असं वाटलं नव्हतं असंही चिराग पासवान यांनी म्हटलं.

आश्चर्य वाटतं पण खरंतर त्यांनी माझ्या रणनितीवर टीका करावी. मात्र प्रमुख मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी त्यांचा हा प्रकार सुरू आहे. तो यशस्वी होणाक नाही आणि जनतासुद्धा नितिश कुमार यांना माफ करणार नाही असे चिराग पासवान म्हणाले. 

विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पूर्वसंध्येला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये चिराग पासवान दिवंगत वडील रामविलास पासवान यांच्या फोटोसमोर श्रद्धांजली वाहत असल्याचं शूट करताना दिसत आहेत. चिराग यांनी आरोप केला की हा व्हिडिओ मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या म्हणण्यानुसार जदयूच्यावतीने व्हायरल केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chirag paswan reply after viral video before voting