मुलीला सॅल्युट करताना वडिलांचा उर अभिमानाने आला भरून; पोलिस दलाने शेअर केला फोटो

टीम ई सकाळ
Monday, 4 January 2021

पोलिस दलात मंडल निरीक्षक असलेल्या वडिलांनी पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला सॅल्युट केला. सर्वांसमोर केलेल्या या सॅल्युटमुळे सगळेच भावूक झाले होते. 

हैदराबाद - आई-वडिलांना आपल्या पाल्याने केलेल्या चांगल्या कामगिरीचं कौतुक असतंच आणि ते अभिमानाने मिरवतात. असाच अभिमानास्पद आणि भावूक असा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आंध्र प्रदेशात तिरुपती पोलिस दलात मंडल निरीक्षक असलेल्या वडिलांनी पोलिस उपअधीक्षक झालेल्या मुलीला सॅल्युट केला. सर्वांसमोर केलेल्या या सॅल्युटमुळे सगळेच भावूक झाले होते. आंध्र प्रदेश पोलिस विभागाने हा फोटो ट्विटरवरून शेअर केला आहे. 

मंडल निरीक्षक वाय श्याम सुंदर यांनी लेकीला सॅल्युट केला. तो क्षण अभिमानास्पद होता असं त्यांनी म्हटलं आहे. वाय श्याम सुंदर यांची मुलगी येंदलुरू जेसी प्रसनती हिला सॅल्युट केला. ती आता गुंटूर जिल्ह्यात पोलिस उपअधीक्षक म्हणून रुजू झाली आहे. 4 ते 7 जानेवारी या कालावधीत आंध्र प्रदेश पोलिस दलाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी ते तिरुपती इथं आले आहेत. 

हे वाचा - जगातील पाच अंधापैकी एक भारतात, पण अद्यापही नाही नॅशनल कॉर्निअल ग्रीड

जेसी प्रसनती यांनी म्हटलं की, ड्युटीवर असताना समोरासमोर पहिल्यांदाच आलो होतो. त्यांनी मला सॅल्युट केला तेव्हा कसंतरीच वाटलं. शेवटी माझे वडील आहेत. मला सॅल्युट करू नका असं म्हणाले  पण तरीही त्यांनी सॅल्युट केला. तेव्हा मी सुद्धा त्यांना सॅल्युट केला असं जेसी प्रसनती यांनी सांगितलं.

जेसी 2018 मध्ये पोलिस दलात भरती झाल्या होत्या. तेव्हापासून आतापर्यंत ड्युटीवर असताना त्या आणि वडील समोर आले नव्हते. जेसी म्हणतात की, वडील माझे मोठे प्रेरणास्थान आहेत. न थकता त्यांनी जनतेची सेवा केल्याचं मी नेहमीच पाहिलं. त्यांची हीच शिकवण घेऊन मी मोठी झाले. लोकांना सर्वतोपरी मदतही त्यांनी केली. त्यामुळेच मी पोलिस दलात जाण्याचा निर्णय़ घेतला. माझा पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असल्याचंही डीसीपी जेसी यांनी सांगितलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: circle inspector salute to his daughter who is dsp