'हिंदी येत नाही म्हटल्यावर विचारलं तुम्ही भारतीय आहात का?'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

‘भारतीय म्हणजे हिंदी असे समीकरण कधीपासून झाले आहे, याची मला माहिती हवी आहे,’’ असे कनिमोळी यांनी hindiimposition या हॅशटॅगद्वारे ट्विट केले आहे.

चेन्नई -  मला हिंदी येत नाही असे म्हटल्यानंतर विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) अधिकाऱ्याने मला, ‘तुम्ही भारतीय आहात का?’ असा प्रश्‍न विचारला, असा आरोप द्रविड मुन्नेत्र कळघमच्या खासदार कनिमोळी यांनी आज केला. दिल्लीला जाण्यासाठी चेन्नई विमानतळावर गेल्यानंतर हा प्रकार घडल्याचे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. 

‘भारतीय म्हणजे हिंदी असे समीकरण कधीपासून झाले आहे, याची मला माहिती हवी आहे,’’ असे कनिमोळी यांनी hindiimposition या हॅशटॅगद्वारे ट्विट केले आहे. या घटनेनंतर ‘सीआयएसएफ’ने ट्विट करत घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले. कनिमोळी यांनी म्हटलं की, दिल्लीला जाण्यासाठी चेन्नई विमानतळावर पोहचल्यावर चौकशी केली जात होती. तेव्हा मी जे विचारायचे ते तामिळ किंवा इंग्रजीतून विचारा मला हिंदी येत नाही असं म्हटलं तर अधिकाऱ्याने थेट तुम्ही भारतीय आहात का असा प्रश्न विचारला. 

आपल्याला एखादी भाषा बोलता येत नसणं किंवा एखाद्या धर्माचे नसल्यानं आपल्या भारताच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित कसा केला जाऊ शकतो. भाषा येत नसेल किंवा विशिष्ट धर्माचे नसेल तर भारतीयत्व कमी होत नाही. देशाचं मोठेपण हे विविधतेमध्ये आणि सर्वसमावेशकतेत आहे. आपण नेमकी हीच गोष्ट विसरत चाललो आहोत अशा भावना कनिमोळी यांनी व्यक्त केल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cisf orders probe in case officer rais question on kanimozhis nationality