विवरणपत्रासाठी 80 वर्षांवरील नागरिक 'आधार'मुक्त 

वृत्तसंस्था
शनिवार, 13 मे 2017

आसाम, जम्मू आणि काश्‍मीर, मेघालयातील व्यक्तींना आधार अथवा आधार नोंदणी क्रमांक प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आता बंधनकारक असणार नाही, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, देशातील 80 वर्षांवरील नागरिकांनाही विवरणपत्र भरण्यासाठी आधारसक्ती असणार नाही. 

नवी दिल्ली : आसाम, जम्मू आणि काश्‍मीर, मेघालय या राज्यांमधील सर्व वयोगटांतील नागरिक आणि देशाच्या अन्य भागांतील 80 वर्षांवरील नागरिकांना प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आधारची गरज नाही, असे परिपत्रक अर्थ मंत्रालयाने काढले आहे. 

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार बंधनकारक करण्याच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आधार बंधनकारक करण्याच्या प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना अर्थ विभागाने हे परिपत्रक काढले आहे. 

आसाम, जम्मू आणि काश्‍मीर, मेघालयातील व्यक्तींना आधार अथवा आधार नोंदणी क्रमांक प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आता बंधनकारक असणार नाही, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, देशातील 80 वर्षांवरील नागरिकांनाही विवरणपत्र भरण्यासाठी आधारसक्ती असणार नाही. 

1.18 कोटी पॅनशी आधारजोडणी पूर्ण 
सरकारने वित्त कायदा 2017 नुसार प्राप्तिकर विवरणपत्रासाठी आधार अथवा आधार नोंदणी क्रमांकाची सक्ती केली आहे. तसेच, पॅनसाठी अर्ज करताना आधारसक्ती 1 जुलैपासून करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 1.18 कोटी पॅनशी आधारजोडणी पूर्ण झालेली आहे. तसेच, पॅनसोबत आधार जोडण्यासाठी प्राप्तिकर विभागाने नवी ई-सुविधाही दिली आहे.

Web Title: Citizens of Jammu Kashmir does not need Aadhar Card to fill ITR