India-China : ‘झटापटी’वरून वातावरण तापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

clash with Chinese soldiers on border demand for discussion India-China relation Lok Sabha today

India-China : ‘झटापटी’वरून वातावरण तापले

नवी दिल्ली : सीमेवर चिनी सैनिकांबरोबर झालेली झटापट आणि भारत चीन संबंधांवर चर्चा व्हावी या मागणीवरून लोकसभेत आज वातावरण तापले. चर्चा होत नसल्याने काँग्रेस, तृणमूलच्या खासदारांनी सभात्याग करून नाराजी व्यक्त केली. तवांग भागात अतिक्रमण करणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी पिटाळून लावल्याच्या ९ डिसेंबरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी भारत चीन संबंधांवर अधिवेशनात चर्चेची आग्रही मागणी केली आहे. या मुद्द्यासह अन्य सहमतीच्या विषयांवर सरकारविरुद्ध विरोधी पक्षांची रणनीती ठरविण्यासाठी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात आज सकाळी विरोधी नेत्यांची बैठक झाली होती. सोबतच, काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी भारत-चीन सीमेवरील स्थितीवर चर्चेच्या मागणीसाठी कार्यस्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती. तर याच पक्षाचे अन्य खासदार गौरव गोगोई यांनी सीमा संघर्षांनंतरही चीनकडून आयात का वाढली यावर चर्चेसाठी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली.

अर्थात, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व कार्यस्थगन प्रस्ताव अमान्य केले. त्यानंतर काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी त्याचप्रमाणे मनीष तिवारी यांनी लोकसभेमध्ये पुन्हा एकदा भारत चीन संबंधांवर चर्चेची मागणी रेटण्याचा प्रयत्न केला. प्रश्नोत्तराचा तास संपताच अधीररंजन चौधरी या मागणीसाठी आक्रमक झाले होते. तृणमूलचे सौगत रॉय यांनीही चर्चेची मागणी केली. मात्र त्यासाठी परवानगी न मिळाल्याने काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, अधीररंजन चौधरी यांच्यासह सर्व खासदार, त्यानंतर तृणमूलच्या खासदारांनी सभात्याग करून नाराजी व्यक्त केली. यानंतर शून्यकाळात तिवारी यांनी हा विषय मांडला.

मनीष तिवारी म्हणाले, की १९५० पासून १९६७ पर्यंत जेव्हा कधी चीनशी तणाव वाढला तेव्हा सदनात भारत चीन संबंधांवर व्यापक चर्चा झाली. १९६२ ला चीनशी युद्ध सुरू होते. त्यावेळी याच सदनात ८ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर १९६२ अशी प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्यात १६५ सदस्यांनी भाग घेतला होता. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे, की सप्टेंबर २०२० पासूनचे हे सहावे अधिवेशन आहे. परंतु सीमेवरील परिस्थिती तसेच चीनशी संबंध यावर एकदाही चर्चा झाली नाही. संवेदनशील परिस्थिती पाहता चर्चा होणे आवश्यक आहे. परंतु, म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचा आरोप मनीष तिवारी यांनी केला.

‘चीनच्या कुरापती लपविण्याचे कारण काय?’

तवांगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. त्याचा थेट परिणाम संसदेच्या कामकाजावर दिसून येत आहे. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही काँग्रेससह बहुतांश विरोधी सदस्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी कामकाजाच्या प्रारंभीच सभात्याग केला. चीनच्या कुरापती लपविण्याचे करण्याचे कारण काय? असे विचारतानाच चर्चेपासून मोदी सरकार का पळ काढत आहे, असा विरोधी पक्षांचा सवाल आहे.                                      

राज्यसभेत अजूनही सरकार बहुमतात नाही. परिणामी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात विरोधी पक्ष नेते आहेत. काँग्रेसच्या पुढाकाराने तवांगच्या मुद्द्यावर सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेत्यांची जी बैठक बोलावली गेली तीत याबद्दल पूर्ण तयारी करण्यात आली होती. तवांगमधील भारत-चीन चकमकीबद्दल सरकारने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. फौजिया खान यांनी चिनी अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करताना हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याचे सांगितले. मात्र उपसभापती हरिवंश यांनी या मुद्यावर काल विरोधकांना बोलण्याची संधी दिल्याचे सांगून चर्चेला परवानगी नाकारली. त्यानंतर विरोधकांनी बहिष्कार केला.