‘गोविंदभोग’ तांदळावरील सीमाशुल्क हटवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Govindbhog Rice

‘गोविंदभोग’ तांदळावरील सीमाशुल्क हटवा

कोलकता : ‘पश्चिम बंगालची ओळख असणाऱ्या ‘गोविंदभोग’ या तांदळावरील २० टक्के सीमाशुल्क माफ करण्यात यावे,’ अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. ज्या पद्धतीने बासमती तांदळाला ही सवलत देण्यात येते तशाचप्रकारची सवलत या तांदळाला देखील देण्यात यावी असे त्यांचे म्हणणे आहे.

ममतादीदींना केंद्र सरकारला पत्र लिहिले असून त्यात त्यांनी या तांदळावर वीस टक्के सीमाशुल्क आकारल्याने याचा त्याच्या निर्यातीला जबर फटका बसला असल्याचे म्हटले आहे. याचा या तांदळाची मागणी आणि देशांतर्गत किमतीवर देखील प्रतिकूल परिणाम झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील कमी झाले असल्याचे बॅनर्जी यांनी या पत्रात म्हटले आहे.

या दोन पानी पत्रामध्ये ममता बॅनर्जी यांनी बासमती तांदळाचे उदाहरण देताना त्यावरील वीस टक्के सीमाशुल्क माफ करण्याचा केंद्राचा निर्णय कौतुकास्पद होता. आता गोविंदभोग तांदळावरील सीमाशुल्क कमी करून शेतकरी आणि उद्योजकांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पश्चिम बंगालमधील मोजक्या जिल्ह्यामध्ये गोविंदभोग तांदळाचे उत्पादन घेण्यात येते. या तांदळाला २०१७ मध्ये भौगोलिक मानांकन देण्यात आले होते.

...म्हणून अर्थकारणाला फटका

पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात गोविंदभोग तांदळाचे उत्पादन घेण्यात येते. बदलत्या अर्थकारणाचा या तांदळाच्या उत्पादनाला जबर फटका बसला असून निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या उत्पादनात काहीशी घट झाल्याचे दिसून येते. या तांदळाची वैशिष्ट्यपूर्ण चव आणि त्याच्या सुगंधामुळे त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. पण केंद्राने सीमाशुल्क लागू केल्याने याचा शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला फटका बसला होता.