बेरोजगारीबाबत सीएमआयईचा महत्वाचा अहवाल; जुलैत ५० लाख नोकऱ्यांवर गदा

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 18 August 2020

लॉकडाउन घोषित झाल्यावर, म्हणजेच मार्चनंतर तिपटीने वाढलेला बेरोजगारीचा दर पूर्व पदावर आला आहे.

नवी दिल्ली- लॉकडाउन घोषित झाल्यावर, म्हणजेच मार्चनंतर तिपटीने वाढलेला बेरोजगारीचा दर पूर्व पदावर आला आहे. असे जरी असले तरी जुलै महिन्यात ५० लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखरेख ठेवणाऱ्या ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ने या संस्थेने अहवाल प्रसिद्ध केला आहे.

टाटाला मागे टाकणारी Dream 11 कंपनी आहे तरी काय?

फेब्रुवारी महिन्यात ७.७६ टक्के असलेला बेरोजगारीचा दर मार्च महिन्यातील लॉकडाउन नंतर वाढत एप्रिलमध्ये २३.५२ टक्‍क्‍यांवर पोहोचला होता. आता त्यात घट होत जुलै महिन्यात तो ७.४३ टक्‍क्‍यांवर आला आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक म्हणजे १ कोटी ७७ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या होत्या. पुढे मे महिन्यात १० लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या मात्र जून महिन्यात ३९ लाख नवीन लोकांना नोकऱ्या मिळाल्या होत्या. हे चक्र पुन्हा उलटे फिरत जूनमध्ये अतिरिक्त ५० लाख लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे. नियमित पगारांच्या नोकऱ्यांवर जुलै महिन्यात सर्वांत जास्त गदा आली. नोकऱ्या पुन्हा मिळण्याची शक्‍यता कमी असते, त्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का पोचत असल्याचे सीएमआयई ने म्हटले आहे.

एसबीआयच्या खातेदारांसाठी मोठी बातमी; मिनिमम बॅलन्स संदर्भात बँकेचा मोठा निर्णय

राज्यातील दरही ४.४ टक्‍क्‍यांवर

देशांप्रमाणे महाराष्ट्रात लॉकडाउननंतर एप्रिल महिन्यात २०.९ टक्‍क्‍यांवर पोचलेला बेरोजगारीचा दर जुलै महिन्यात ४.४ टक्‍क्‍यांवर आला आहे. देशातील सर्वाधिक कमी बेरोजगारीचा दर गुजरातमध्ये १.९ टक्के आहे. सध्या सगळ्यात जास्त बेरोजगारीचा दर हरियाना राज्यात २४.५ टक्के आहे.

राज्यांमधील बेरोजगारीचा दर (टक्के)
महाराष्ट्र - ४.४
गुजरात - १.९
मध्यप्रदेश - ३.६
पश्‍चिम बंगाल - ६.८


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CMIE's important report on unemployment 5 million jobs in July