Manipur terrorist attack: आठ वर्षांच्या अबीरच्या शवपेटीने हेलावले नेटीझन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manipur terrorist attack
आसाम रायफल्सच्या हुतात्मा जवानाच्या कुटुंबाला भावपूर्ण श्रद्धांजली #ManipurTerroristAttack #SakalNews

आठ वर्षांच्या अबीरच्या शवपेटीने हेलावले नेटीझन

रायगड, छत्तीसगड : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पत्नीसह हुतात्मा झालेल्या कर्नल विप्लव त्रिपाठी यांचा आठ वर्षीय मुलगा अबीर याच्या शवपेटीमुळे नेटीझन हेलावले. मणिपूरमध्ये आघाडीवरील छावणीकडे जात असताना शनिवारी त्यांच्या वाहनावर हल्ला झाला होता.

कर्नल विप्लव, पत्नी अनुजा, अबीर आणि आसाम रायफल्सचे इतर चार जवान मारले गेले. त्रिपाठी यांच्यावर छत्तीसगडमधील रायगड या मुळ गावी शासकीय आणि लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शेकडो नागरिक उपस्थित होते. विप्लव यांच्या आई-वडिलांकडे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी तिरंगा सुपुर्द केला. तेव्हाचा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आली.

जम्मू-काश्मीरचे पोलिस अधिकारी ताहीर अश्रफ यांनी म्हटले आहे की, ही शवपेटी सर्वांत जड आहे. त्यामुळे तुम्ही हेलावून जाणार नसाल तर इतर कशामुळेही असे होणार नाही. मेजर गौर्वय आर्य म्हणाले की, लढाईत आपले रक्त सांडण्यास प्रत्येक जवानाची तयारी असते, पण कुटुंबाला लक्ष्य केले जाणार नाही असा अलिखित नियम असतो. दहशतवाद्यांनी हा नियम मोडला.

उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग यांनी कर्नल त्रिपाठी यांना श्रद्धांजली अर्पण केली. कुटुंब आणि लहान मुलाला लक्ष्य करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे आणि हीन दर्जाचे कृत्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आजोबांपासून प्रेरणा

विप्लव यांचे मामा राजेश पटनाईक यांनी सांगितले की, आजोबा किशोरीमोहन त्रिपाठी हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्यापासून विप्लवला लष्करी गणवेश घालण्याची प्रेरणा मिळाली. १९९४ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा विप्लव १४ वर्षांचा होता.

loading image
go to top