

High Court on Compassionate Appointment
esakal
बंगळूर : सरकारी कर्मचाऱ्याच्या आकस्मिक निधनानंतर आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, या उद्देशाने दिली जाणारी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती ही एकवेळची मदत आहे. या नियुक्तीनंतर अधिक शैक्षणिक पात्रता असल्याचे कारण देत सातत्याने उच्च पद किंवा अतिरिक्त सवलतींची मागणी करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. बेळगाव येथील भूमिअभिलेख सहायक संचालक कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात न्यायालयाने हा निर्णय दिला.
संबंधित कर्मचाऱ्यांची २०१८ मध्ये अनुकंपा तत्त्वावर द्वितीय श्रेणी सहायक (एसडीए) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी एकाकडे मेकॅनिकल अभियांत्रिकीची पदवी असून, आपली शैक्षणिक पात्रता अधिक असल्याने प्रथम श्रेणी सहायक (एफडीए) पदावर नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. यासाठी त्यांनी कर्नाटक प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (केएटी) धाव घेतली होती. केएटीने त्यांच्या मागणीचा विचार करून एफडीए पदासाठी त्यांना विचारात घेण्याचे निर्देश सरकारला दिले होते.
या आदेशाला राज्य सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्न आणि न्यायमूर्ती हेमा कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारची बाजू मान्य करत केएटीचा आदेश रद्द केला. उच्च शैक्षणिक पात्रता असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला विशिष्ट पदासाठी पात्रता मिळू शकते; मात्र त्याच पात्रतेच्या आधारावर अनुकंपा योजनेतून उच्च पद मिळण्याचा स्वतंत्र कायदेशीर अधिकार निर्माण होत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
याशिवाय, यापूर्वी एखाद्या व्यक्तीला नियमबाह्य पद्धतीने शैक्षणिक पात्रतेच्या आधारे उच्च पदाचा लाभ मिळाला असेल, तर त्याच उदाहरणाचा आधार घेऊन अन्य व्यक्तीलाही तसाच लाभ मागता येणार नाही. एका चुकीच्या किंवा नियमबाह्य निर्णयाचा आधार घेऊन दुसऱ्या नियमबाह्य निर्णयासाठी हक्क निर्माण होत नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
कुटुंबाला आधार हाच उद्देश सरकारी कर्मचाऱ्याच्या अचानक निधनामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडते. अशा वेळी त्या कुटुंबाला तातडीने आधार मिळावा, हा अनुकंपा नियुक्ती योजनेचा मूलभूत उद्देश आहे. त्यामुळे एकदा या योजनेअंतर्गत नियुक्ती मिळाल्यानंतर त्याच आधारावर पुढेही उच्च पदासाठी सवलतींची मागणी करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.