कंप्युटर बाबावरुन राजकीय चिखलफेक; दिग्विजय सिंह तुरुंगात जाऊन घेणार भेट

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 9 November 2020

नामदेवदास त्यागी उर्फ कंप्युटर बाबा याच्या आश्रमातील अतिक्रमणाविरुद्ध कारवाई झाल्यानंतर मध्य प्रदेशात राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे

भोपाळ- नामदेवदास त्यागी उर्फ कंप्युटर बाबा याच्या आश्रमातील अतिक्रमणाविरुद्ध कारवाई झाल्यानंतर मध्य प्रदेशात राजकीय चिखलफेक सुरू झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी इंदूरच्या मध्यवर्ती तुरुंगात जाऊन त्यागीची भेट घेणार असल्याचे जाहीर केले.

गोशाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर त्यागीने अतिक्रमण केल्याबद्दल इंदूर महानगरपालिका प्रशासनाने रविवारी कारवाई केली. आश्रमाचे बांधकाम अवैध असल्याचेही सांगण्यात आले. त्यागीला त्याच्या सहकाऱ्यांसह रविवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिग्विजय यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. काँग्रेसचे स्थानिक आमदार विशाल पटेल यांनी आंदोलनाचा इशारा दिला. ते म्हणाले की, समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन आश्रमात मंदिर बांधले आहे. ते पाडण्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्यास लोक आंदोलन छेडतील.

चिराग पासवानांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर तेजस्वी यादवांचा रिप्लाय

कंप्युटर बाबाच्या आश्रमातील बांधकाम कोणतीही नोटीस न बजावता पाडण्यात आले. सुडाच्या राजकारणाचे हे टोक आहे, असं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणालेत. सरकारी जागेवरील अतिक्रमणाला काँग्रेसचा पाठिंबा आहे का ? गोशाळेसाठी आरक्षित जागेवर त्यागीने अतिक्रमण केले. ते हटविणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. यात काँग्रेस नेते अकारण राजकारण करीत आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा यांनी केला आहे. दरम्यान, त्यागीच्या आश्रमात रायफल आणि एअरगन सापडल्या असून पोलीस चौकशी करीत आहेत.

राजकीय कोलांटउडी

२०१८ मध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वी त्यागीने शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारशी फारकत घेतली. नर्मदा नदीत अवैध वाळूउपसा सुरू असल्याचा आरोप त्याने केला होता. अलिकडेच पोटनिवडणूकीच्यावेळी त्याने लोकशाही बचाव आंदोलन छेडले होते. तेव्हा त्याने भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे २२ बंडखोर आमदार गद्दार असल्याचा आरोप केला होता.

राज्यमंत्री पदाचा दर्जा

मध्य प्रदेशात आधीच्या भाजप सरकारने त्यागीला राज्य मंत्री पदाचा दर्जा दिला होता. कमल नाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने नर्मदा नदी विकासासाठी स्थापन केलेल्या एका ट्रस्टचे अध्यक्षपद त्यागीकडे सोपविले होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: computer baba congress digvijay singh will meet him in jail