चिराग पासवानांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर तेजस्वी यादवांचा रिप्लाय

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 9 November 2020

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. १०) जाहीर होणार आहे.

पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी (ता. १०) जाहीर होणार आहे. मतदानोत्तर कल चाचण्यांनंतर मध्ये बिहारचे भावी मुख्यमंत्री अशी चर्चा सुरू झालेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते (आरजेडी) तेजस्वी यादव यांनी त्यांचा ३१ वा वाढदिवस सोमवारी आई राबडी देवी व कुटुंबासह साजरा केला. या पार्श्वभूमीवर लोक जनशक्ती पार्टीचे (LJP)प्रमुख चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तेजस्वी यादव यांनीही यावर उत्तर देताना 'शुक्रिया भाई' अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

आनंदाची बातमी! Pfizer आणि BioNTech च्या कोरोना लशीचे रिझल्ट हाती

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही तेजस्वी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  तेजस्वी यांचे वडील व ‘आरजेडी’चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव हे चारा भ्रष्टाचारात सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. यामुळे तेजस्वी यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याच्या निर्णयाचा सन्मान करीत घरीच थांबण्याचे व मतमोजणीसाठी त्या त्या मतदारसंघात उपस्थित राहण्याचे आवाहन ‘आरजेडी’ने रविवारी (ता. ८) केले होते. तेजस्वी यांचा वाढदिवस दरवर्षी युवादिन म्हणून साजरा केला जातो. पण वाढदिवसाच्यानिमित्त मतमोजणीपूर्वी लोकांनी रस्त्यांवर येऊन उत्साह साजरा करण्याची गरज नसल्याचे तेजस्वी यांचे म्हणणे असल्याचे ‘आरजेडी’चे प्रवक्ते अरुण कुमार यादव यांनी सांगितले.

‘निकालनंतर संयम बाळगा’

बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल काही लागला तरी संयम बाळगण्याचे निर्देश ‘आरजेडी’ने कार्यकर्त्यांना दिले आहेत. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. निवडणूक निकालावरून कोणीही अतिउत्साह काही करू नका. संयम, सहजपणे आणि सन्मानाने निकालाचा स्वीकार करा. गोंधळ करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. निकालानंतर अनुचित घोषणा, फटाके उडविणे, प्रतिस्पर्ध्यांबाबत गैरवर्तन असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. असे करणाऱ्यांविरोधात पक्ष कठोर कारवाई करेल, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे. निकालादरम्यानच्या स्‍थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ‘आरजेडी’ने प्रदेशाध्यक्ष जगदानंदसिंह यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यांची देखरेख समितीही स्थापन केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LJP Chirag Paswan wishes Tejashwi Yadav on his birtday